दिल्लीसह मुंबईत कोरोनाची लाट

0
100

>> गोमंतकीयांना सतर्क राहण्याचे आवाहन

देशात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. सध्या मृत्यूची संख्या १.३२ लाखांवर पोहोचली आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या १५ दिवसांत दिल्लीत सुमारे १४०० लोक मरण पावले आहेत. महाराष्ट्रात काल एकाच दिवसात तब्बल ५७५३ नव्या रुग्णांची नोंद झाली असून त्यांपैकी ११३५ मुंबईत सापडले. दरम्यान, दिल्ली व महाराष्ट्रात कोरोनाची पुन्हा लाट आल्याने गोव्यातील जनतेला सतर्कता बाळगण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे.

महाराष्ट्रात काल ५० जणांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या ४६,६२३ वर पोचली आहे. काल दिवसभरात एकूण ४,०६० कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत महाराष्ट्रात एकूण बाधितांची संख्या १७,८०,२०८ वर पोचली असल्याचे आरोग्य खात्याने म्हटले आहे. सध्या महाराष्ट्रात ८१,५१२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनामुक्त होणार्‍या रुग्णांची टक्केवारी ९२.७५ टक्के आहे. कोरोना बळींची टक्केवारी २.६१ इतकी आहे.
मुंबईत गेल्या चोवीस तासांत ११३५ नव्या रुग्ण सापडल्याने लोक धास्तावले आहेत. मुंबईत काल १९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. आतापर्यंत मुंबई शहरात बळींची संख्या १०,६७५ वर पोचली आहे.

दिल्लीत काल रविवारी ६७४६ नवे कोरोनाबाधित सापडले. तर १२१ बाधितांचा मृत्यू झाला असून एकूण बळींची संख्या ८,३९१ वर पोचली आहे. शनिवारी आरोग्य खात्याने ५४,८९३ जणांचे स्वॅब नमुने चाचणीसाठी घेतले होते. दिल्लीत काल दिवसभरात बळींची संख्या शंभरपार झाली आहे. गेल्या ११ दिवसांत पाचव्यांदा बळींची संख्या शंभरावर गेली आहे. शनिवारी दिल्लीत १११ जणांचा मृत्यू झाला होता. सध्या ४०,२१२ ऍक्टिव्ह रुग्ण दिल्लीत आहेत. एकूण बाधितांची संख्या ५,२९,८६३ वर पोचली आहे. दिल्लीत स्मशानघाटावर नेहमी १०० हून अधिक मृतदेह येत आहेत. २० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे तर ८० जणांचा इतर रोगांमुळे मृत्यू होत आहे.