दिल्लीत सापडली एक हजार जिवंत काडतुसे

0
95

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष भेटीच्या पार्श्‍वभूमीवर
प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले असून या पार्श्‍वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असताना काल दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला एक हजार जिवंत काडतुसे सापडली. याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष पथकाचे विशेष आयुक्त एस. एन. श्रीवास्तव माहिती देताना म्हणाले की, याप्रकरणी तीघा जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडील १०२० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. अटक केलेल्यांची नावे मोहम्मद इमरान, मिरतचा शरिक आणि उत्तराखंडचा ङ्गाहिम अशी आहेत. त्यांचा हल्ल्याचा काहीही कट नसल्याचे त्यांच्या चौकशीअंती स्पष्ट झाले असल्याचे ते म्हणाले. परंतु सावधगिरी म्हणून त्यांची गंभीर दखल घेण्यात आली आहे.
दरम्यान, गुप्तहेरांकडून मिळालेल्या माहितीनुसार ओबामा यांच्या भेटीदरम्यान दहशतवादी हल्ल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असल्याने राजपथावर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या कक्षाजवळ सात स्तरांची सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी जमिनीसह हवाई सुरक्षेच्याबाबतीतही अभूतपूर्व दक्षता घेण्यात आली आहे. अमेरिकी गुप्तहेर संस्थेचे पथकही दाखल झाले आहे.
‘नो फ्लाय झोन’ची मागणी फेटाळली
दरम्यान, अमेरिकी सुरक्षा यंत्रणेने २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी राजपथावरून विमानांच्या उड्डाणास परवानगी न देण्याची केलेली मागणी भारताने फेटाळली आहे. परंपरेनुसार विमानांची प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.