दिल्लीत दहशतवादी घुसल्याच्या शक्यतेने सर्वत्र अतिदक्षता

0
116

पाकिस्तानमधील जैश ए महंमद या दहशतवादी संघटनेचे चार दहशतवादी दिल्लीत प्रवेशल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली असून येत्या उत्सवी काळामध्ये एखादा दहशतवादी हल्ला चढवण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो. त्यामुळे केंद्र सरकारने सर्व सुरक्षा यंत्रणांना दक्षतेचे आदेश दिले आहेत. उत्तर भारतातील विमानतळांनाही अतिदक्षतेचा आदेश दिला गेला असून खास सुरक्षा उपाय योजण्यास सांगण्यात आलेले आहे.

दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेला केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने दिल्लीत चार दहशतवाद्यांनी शिरकाव केला असल्याचे सूचित केले. या चौघांपाशीही मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे असल्याचा कयास आहे. दिल्ली पोलिसांनी विविध भागांत छापेमारी सुरू केली असून विशेषतः दिल्लीच्या उपनगरांमध्ये या संशयितांचा शोध घेण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी काल सकाळी झालेल्या बैठकीत यासंदर्भात परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
‘‘आम्ही दक्ष आहोत आणि सर्वतोपरी उपाययोजना करीत आहोत. मिळालेल्या सर्व प्रकारच्या माहितीवर आम्ही काम करतो आहोत. चिंतेचे कारण नाही’’ असे दिल्लीचे पोलीस उपायुक्त एम. एस. रंधावा यांनी सांगितले.

जम्मू काश्मीरचे विशेषाधिकार हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर भारतामध्ये दहशतवादी हल्ले चढवण्याचे बेत पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना सातत्याने आखत असून पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोबाल यांना लक्ष्य करण्याचा कट आखला गेला असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाल्यानंतर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

गृह मंत्रालयाने देशातील तीस प्रमुख शहरांना अतिदक्षतेचे आदेश दिले आहेत. भारतीय हवाई दलालाही सज्ज ठेवण्यात आले आहे. महत्त्वाच्या आस्थापनांच्या ठिकाणी अतिदक्षता बाळगली जात असून भारतीय हवाई दलाच्या श्रीनगर, अवंतीपुरा, जम्मू, पठाणकोट व हिंडोन येथील तळांवर सुरक्षा कडक करण्यात आली आहे.
संरक्षण मंत्रालय व गुप्तचर यंत्रणांतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या १० सप्टेंबरला एक धमकीचे पत्र नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सुरक्षा दलाला सापडले असून हिंदीत लिहिलेल्या सदर पत्रामध्ये जैश ए महंमदचा शमशेर वाणी याने हल्ल्याची धमकी दिली आहे.