कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातून दाखल झालेल्या आंदोलक शेतकर्यांना अखेर दिल्लीत प्रवेश मिळाला असून त्यांना दिल्लीच्या बुराडी स्थित निरंकारी मैदानात आंदोलन करण्यास परवानगी दिली आहे. परंतु, या मैदानाच्या बाहेर कुठेही जाण्यास शेतकर्यांना मनाई केली असून पोलिसांची त्यांच्यावर सक्त नजर कायम असेल. शेतकर्यांनी जंतरमंतर किंवा रामलीला मैदानात आंदोलनासाठी परवानगी मागितली होती. मात्र ती नाकारली असून त्यांना निरंकारी मैदानात आंदोलन करण्यास सांगण्यात आले आहे.
आंदोलन काळात कोरोनाच्या मार्गदर्शक तत्वांसह इतर नियमांचे पालन करू असे आश्वासन शेतकर्यांनी दिले आहे.
शुक्रवारी सिंघू सीमेवर शेतकर्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांकडूनही वॉटर कॅनन आणि अश्रुधुराचा वापर करण्यात आला. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या दिल्लीत लोकांना मोठ्या संख्येने एकत्र येण्यावर तसेच विविध कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र हे आंदोलक महिनाभर पुरेल एवढी अत्यावश्यक साधनसामग्री घेऊनच दिल्लीत दाखल झाले आहेत.
दरम्यान, कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी, या शेतकर्यांना सरकारने ३ डिसेंबर रोजी चर्चेचं आमंत्रण दिले असल्याचे त्यांनी सांगितले.