कार्लुस घेणार मध्यवर्ती ग्रंथालयाचा निरोप

0
249

>> ग्रंथालयाच्या विकासात मौलिक योगदान

राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाचे क्यूरेटर डॉ. कार्लुस फर्नांडिस हे मध्यवर्ती ग्रंथालयाचा निरोप घेत असून येत्या १ डिसेंबरपासून गोवा विद्यापीठाच्या ग्रंथालय व माहिती विज्ञान विभागात रुजू होणार आहेत. डॉ. फर्नांडिस यांचनी ग्रंथालय विकासाच्या कामात महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. त्यांची ग्रंथपाल ते गोवा विद्यापीठाच्या ग्रंथालय आणि माहिती विज्ञान विभागाचे साहाय्यक प्राध्यापक अशी यशस्वी वाटचाल आहे.

डॉ. फर्नांडिस हे शिवाजी विद्यापीठातून ग्रंथपाल पदवी मिळविल्यानंतर गोमंत विद्या निकेतनमध्ये साहाय्यक ग्रंथपाल म्हणून रुजू झाले. नवनवीन ठिकाणी ग्रंथपाल म्हणून काम करताना त्यांनी आपल्या कार्यक्षमतेची चुणूक दाखविली आहे. सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय बायणा वास्को, गोवा विद्यापीठ, सारस्वत महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून काम केले. फर्मागुडी अभियांत्रिकी महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून ११ वर्षे कार्य केले. २००६ पासून राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाचे क्यूरेटर म्हणून कार्यरत असताना राज्यातील ग्रंथालय विकासावर भर दिला. दक्षिण गोव्यात जिल्हा ग्रंथालय, केपे, कुंकळ्ळी आदी ठिकाणी नवीन ग्रंथालय सुरू करण्यात आली. राज्य सरकारने डॉ. फर्नांडिस यांचा उत्कृष्ट ग्रंथपाल म्हणूनही सन्मान केला आहे.

डॉ. फर्नांडिस मागील तीन दशकांहून अधिक काळ राज्याच्या ग्रंथालय क्षेत्रात कार्यरत आहेत. ग्रंथालय चळवळीच्या विकासासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाचे क्यूरेटर म्हणून मागील चौदा वर्षे ते कार्यरत असून या ग्रंथालयाला देशातील आघाडीचे ग्रंथालय बनविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. ग्रंथालयाच्या कामकाजाचे श्रेय आपल्याकडे न घेता ते श्रेय नेहमीच कर्मचार्‍यांना देतात. डॉ. फर्नांडिस ग्रंथालय विषयात पीएचडी करणार्‍यांना मार्गदर्शन करीत आहेत.

ग्रंथालये वाचकांमुळे चालतात
वाचक आणि सभासद यांच्यामुळे ग्रंथालये चालतात. त्यामुळे वाचकांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करण्याकडे जातीने लक्ष दिल्याचे ते सांगतात. मी स्वतः ग्रंथालयातील कामकाजात सहभाग घेत असल्याने कर्मचारिवर्गसुद्धा हिरिरीने सहभाग घेतो, असे डॉ. फर्नांडिस म्हणाले.