दिनदयाळ योजनेसाठी नोडल अधिकारी नेमणार ः आरोग्यमंत्री

0
120

दिनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेचा लाभ घेणार्‍या रुग्णांची खासगी इस्पितळांकडून फसवणूक होऊ नये यासाठी एका नोडल अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल विधानसभेत सांगितले. रवी नाईक यांनी विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.

गोवा सरकारच्या दिनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेमुळे विमा कंपनी गब्बर बनली आहे, असे सांगताना सरकारकडून कंपनीला १०३ कोटी रु. मिळाले असून कंपनीला १३ कोटी रु. एवढा नफा झालेला आहे, अशी माहिती रवी नाईक यांनी यावेळी दिली. मात्र, खासगी इस्पितळांकडून रुग्णांची फसवणूक यावेळी होत असून एक-एक वेळा एखादी शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर सदर शस्त्रक्रियेसाठी दिनदयाळ योजनेखाली पैसे मिळत नसल्याचे सांगितले जाते. अन्य वेगवेगळी कारणे सांगूनही फसवणूक केली जात असल्याचे नाईक यांनी सांगितले.

मडगावातही फसवणूक
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनीही यावेळी मडगाव मतदारसंघातही या योजनेचा लाभ घेणार्‍या रुग्णांची फसवणूक होत असल्याचे सांगितले व यापुढे दिनदयाळ स्वास्थय सेवा योजनेचा लाभ घेणार्‍या रुग्णांची फसवणूक होऊ नये यासाठी एका नोडल अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी केली. त्यावर एखाद्या डॉक्टरची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याचे आश्‍वासन राणे यांनी दिले.
रुग्णांना या स्वास्थ्य सेवा योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी राज्यातील एकूण ५४ इस्पितळांची यादी तयार करण्यात आली असल्याची माहितीही राणे यांनी यावेळी दिली. या योजनेच्या काडर्‌‌सचे नूतनीकरण करण्यास विलंब लावला जातो. परिणामी रुग्णांची गैरसोय होते, असा आरोपही रवी नाईक यांनी यावेळी केला.
चर्चिल आलेमांव यांनीही खासगी इस्पितळे रुग्णांची फसवणूक करीत असल्याचा यावेळी आरोप केला.