Home बातम्या दिगंबर कामत यांच्या विरोधात मडगावातून रमाकांत आंगले?

दिगंबर कामत यांच्या विरोधात मडगावातून रमाकांत आंगले?

0

(बबन भगत याजकडून)

इंग्रजी माध्यमातील शाळांना अनुदान देण्याच्या प्रश्‍नावरून वादग्रस्त ठरलेले मुख्यमंत्री व मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्याविरोधात मडगावमधून दक्षिण गोव्याचे माजी आमदार रमाकांत आंगले यांना उमेदवारी देण्याचा निर्णय भाजपने घेतला असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली.

दिगंबर कामत यांच्या विरोधात एका बलाढ्य नेत्याच्या शोधात असलेल्या भाजपने अखेर रमाकांत आंगले यांच्या नावावर जवळजवळ शिक्कामोर्तब केले असल्याचे वृत्त आहे.

भाजपाने रमाकांत आंगले यांच्याविषयी असलेली कटुता व हेवेदावे विसरून त्यांना मडगावमधून पक्षाच्या उमेदवारीची ऑफर दिल्यामुळे राजकीय सन्यांस घेतलेल्या रमाकांत आंगले यांनीही हा प्रस्ताव स्वीकारण्याचा निर्णय घेतला असल्याचे आंगले यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. मडगावमध्ये रमाकांत आंगले हे दिगंबर कामत यांना चांगली टक्कर देऊ शकतात असे भाजपला वाटत असल्यानेच पक्षाने त्यांना ऑफर दिली असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. यावेळी मडगावमध्ये भाजपला देशीभाषाप्रेमींकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा भाजप बाळगून असून भाजपच्या पारंपरिक जनांबरोबरच भाषाप्रेमी व इतरांनी चांगला पाठिंबा दिल्यास मडगावात क्रांती होऊ शकते, असे भाजपमधील सूत्रांनी स्पष्ट केले.

यंदा मडगावमधून दिगंबर कामत यांचा पाडाव करण्यासाठी भाजप सर्वशक्ती पणाला लावणार असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. २००० साली दक्षिण गोव्यातून कॉंग्रेस उमेदवार ज्योकीम आलेमाव यांचा पाडाव करून रमाकांत आंगले हे खासदार बनले होते. त्यावेळी ते कित्येक वर्षांनंतर दक्षिण गोव्यातून निवडून आलेले बिगर कॉंग्रेस खासदार ठरले होते. आता कित्येक वर्षांनंतर ते पुन्हा मडगावमधून विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावणार आहेत. त्यात त्यांना किती यश मिळते याचे उत्तर मात्र काळच देणार आहे.