दिगंबर कामतांविरुध्द न्यायालयात आरोपपत्र

0
150

>> लुईस बर्जर घोटाळा प्रकरण

 

लुईस बर्जर घोटाळा प्रकरणातील संशयित माजी मुख्यमंत्री तथा मडगावचे विद्यमान आमदार दिगंबर कामत यांच्या विरुध्द काल गुन्हा अन्वेषण पोलिसांनी येथील विशेष न्यायालयात पुरवणी आरोपपत्र सादर केले.
गेल्या वर्षी जुलैमध्ये वरील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमांव, जायका प्रकल्पाचे प्रमुख तथा साबांखाचे माजी मुख्य अभियंते वाचासुंदर, लुइस बर्जर कंपनीचे उपाध्यक्ष सत्यकाम महंती, हवाला ऑपरेटर रायचंद सोनी व संशयित म्हणून दिगंबर कामत यांच्या विरुध्द गुन्हे नोंद झाले होते. कामत वगळता अन्य सर्वांना अटक झाली होती. आलेमांव व वाचासुंदर यांना तुरुंगवास झाला होता. कामत यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटक पूर्व जामीन मंजूर केल्याने त्यांना अटक करणे शक्य झाले नव्हते. त्यानंतर गुन्हा अन्वेषण पोलिसांनी उच्च न्यायालयाच्या अटकपूर्व जामीनाच्या आदेशास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयात सदर प्रकरण प्रलंबित
आहे.
आता पोलिसांनी कामत यांच्या विरोधातही आरोप दाखल केले आहे. कामत यांना पोलीस कोठडीत न घेतल्याने अद्याप चौकशी अपूर्ण असल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. उच्च न्यायालयाने दिलेला अटकपूर्व जामिनाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविल्यास कामत यांना अटक करणे शक्य आहे असे पोलीस सांगत होते.
चर्चिल, आलेमांव, वाचासुंदर, सत्यकाम सोनी, रायचंद यांच्यावर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येच आरोपपत्र सादर केले होते.