>> केंद्रीय संरक्षणमंत्री व नागरी हवाई वाहतूकमंत्र्यांची शिष्टमंडळाला ग्वाही
>> मुख्यमंत्र्यांसह माविन गुदिन्हो, रोहन खंवटे व तानावडे यांनी घेतली भेट
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने काल नवी दिल्ली येथे दाबोळी विमानतळाच्या मुद्द्यावर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली. या भेटीवेळी दोन्ही केंद्रीय मंत्र्यांनी गोव्यातील दाबोळी आणि मोपा येथील दोन्ही विमानतळ सुरू ठेवण्याची ग्वाही या शिष्टमंडळाला दिली. दरम्यान, संरक्षणमंत्र्यांकडे दाबोळी विमानतळावरील बफर झोन मर्यादा 200 मीटर वरून 50 मीटरपर्यंत कमी करण्याची मागणी केली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी या भेटीनंतर सांगितले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची नवी दिल्ली येथे काल भेट घेतली. त्यावेळी राजनाथ सिंह यांच्यासमोर प्रामुख्याने दाबोळी विमानतळाचा प्रश्न मांडण्यात आला.
गोवा विधानसभेच्या गत पावसाळी अधिवेशनात दाबोळी विमानतळाच्या अस्तित्वाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. त्यावेळी दाबोळी विमानतळ बंद करू दिला जाणार नाही. संबंधित केंद्रीय मंत्र्यांकडे दाबोळी विमानतळाचा विषय मांडण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने काल नवी दिल्ली येथे राजनाथ सिंह आणि ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेऊन दाबोळी विमानतळाचा विषय सविस्तरपणे मांडला, असे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले.
दाबोळी विमानतळाच्या परिसरातील नव्या बांधकामांसाठी नौदलाकडून वेळेवर ना हरकत दाखला मिळत नाही. तसेच, बांधकाम करणाऱ्यांना नवनवीन अटी घातल्या जातात, असे राजनाथ सिंह यांच्या निदर्शनास आणून देण्यात आलेे. त्यावर राजनाथ सिंह यांनी बांधकामांसाठी ना हरकत दाखल्याच्या प्रश्नावर नौदल प्रमुख व इतर संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले, असेही गुदिन्हो यांनी सांगितले.
योग्य नियोजनाद्वारे दोन्ही विमानतळ कार्यरत ठेवणार
गोव्यातील दोन्ही विमानतळ कार्यरत ठेवण्यासाठी योग्य नियोजन केले जाणार आहे, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी या भेटीत दिली, अशी माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.
राजनाथ सिंह यांच्याकडून ठोस आश्वासन
मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यरत झाल्याने दाबोळी विमानतळ बंद केला जाणार नाही, असे ठोस आश्वासन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या भेटीवेळी दिले, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.