दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दुसर्या सत्रात होणार्या पूर्वतयारी परीक्षेपूर्वी (प्रिलिम्स) आणखी एक परीक्षा घेणाच्या निर्णयावर काल शालांत मंडळाने शिक्कामोर्तब केले.
शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर खूप उशिरा या परीक्षेचा शालांत मंडळाने निर्णय घेतल्याचा दावा करून काही विद्यार्थी व मुख्याध्यापकानी या परीक्षेला विरोध केला होता व ही अतिरिक्त परीक्षा घेऊ नये अशी मागणी करणारी निवेदने गोवा शालांत मंडळाकडे केली होती.
मात्र, या परीक्षेचा निर्णय सप्टेंबर महिन्यातच घेऊन विद्यालयाना त्याबाबत कळवण्यात आले होते. त्यामुळे या परीक्षेसंबंधीचा निर्णय हा शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर विलंबाने घेण्यात आला होता, हा आरोप खोटा असल्याने परीक्षा घेण्याबाबतच्या निर्णयावर शालांत मंडळाच्या काल झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे गोवा शालांत मंडळाचे अध्यक्ष मेरविन डिसोझा यानी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ही परीक्षा ७० गुणांची असल्याची माहिती त्यांनी दिली.