दहशतीचे नवे पर्व

0
58

काश्मीरमध्ये नव्वदच्या दशकातील हिंसाचाराची पुनरावृत्ती घडविण्याच्या प्रयत्नात सध्या दहशतवादी शक्ती आहेत. गेल्या काही दिवसांत सातत्याने अल्पसंख्यक हिंदू आणि शीख समाजातील व्यक्तींच्या ज्या प्रकारे दिवसाढवळ्या निर्घृण हत्या झाल्या, ते पाहिल्यास काश्मिरी पंडित, अन्य हिंदू आणि शीखधर्मीयांनी काश्मीर खोरे सोडून पुन्हा पलायन करावे यासाठी दहशत निर्माण करण्यासाठीच हे हत्यासत्र सुरू आहे हे स्पष्ट होते. ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ ही नवरचित दहशतवादी संघटना त्यामागे आहे आणि ‘छोटा वालीद’ नावाचा पाकिस्तानातून परतलेला कुख्यात दहशतवादी ह्या हल्ल्यांचा मास्टरमाइंड असल्याचेही दिसून आले आहे.
१४ सप्टेंबर १९८९ रोजी टिकालाल टपलू ह्या काश्मिरी पंडिताची दहशतवाद्यांनी हत्या केली आणि त्यानंतरच्या अत्यंत निर्घृण हत्यासत्राद्वारे निष्पाप पंडितांना काश्मीर आणि घरदार रातोरात सोडून जाण्यास दहशतवाद्यांनी भाग पाडले होते. मोदी सरकारच्या काश्मीरसंदर्भातील खमक्या नीतीमुळे आता हे पंडित खोर्‍यात परतू लागले होते. ३७० आणि ३५ अ कलमाच्या उच्चाटनानंतर आणि दहशतवाद्यांच्या स्थानिक म्होरक्यांच्या सातत्यपूर्ण नायनाटानंतर काश्मीर खोरे अल्पसंख्यकांसाठी सुरक्षित आहे असे चित्र निर्माण झाले. अनेक पंडित कुटुंबे त्यामुळे काश्मीरमध्ये मूळ गावी परतली. सरकारने रोजगारसंधींसाठी किमान वास्तव्याचा नवा कायदाही लागू केला. त्यामुळे आपला प्रभाव आता ओसरत चालल्याचे दहशतवाद्यांना आणि त्यांच्या पाकिस्तानी पाठिराख्यांना सतत जाणवू लागले आहे. त्यामुळे पुन्हा एकवार खोर्‍यामध्ये दहशत माजवण्यासाठी हे हत्यासत्र त्यांनी चालवले आहे.
प्रथम माखनलाल बिंद्रू यांची हत्या झाली. हे श्रीनगरच्या इक्बाल पार्कमध्ये बिंद्रू मेडिकेट हे औषधालय चालवायचे. नव्वदच्या दशकात सारी पंडित कुटुंबे काश्मीर सोडून गेली, तरीही ते आपल्या कुटुंबीयांसह धैर्याने श्रीनगरमध्ये राहिले होते. जनतेला औषधे पुरवीत आले होते. अशा सेवाभावी व्यक्तीची दहशतवाद्यांनी निर्घृण हत्या घडविली. त्यांच्या कन्येने त्यानंतर शोक न करता जी प्रतिक्रिया दिली ती तर असीम धैर्याचे उदाहरण म्हणायला हवी. दहशतवाद्यांनी श्रीनगरच्या मध्यवस्तीत ईदगाह परिसरातील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयावर मोहरा वळविला आणि तेथील मुख्याध्यापिका सुपुंदर कौर आणि हिंदू शिक्षक दीपक चंद यांना त्यांची ओळखपत्रे पाहून ठार केले. त्यांचा गुन्हा काय तर त्यांनी शाळेत गेल्या पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्यदिन सोहळा साजरा केला होता. दहशतवाद्यांनी जाताना वीरेंद्र पास्वान या रस्त्यात गोलगप्पे आणि भेळपुरी विक्री करणार्‍या वीरेंद्र पास्वान या तरुणालाही गोळ्या घातल्या. तो बिचारा रोजीरोटीसाठी आला होता. ह्या सार्‍या हत्या पाहिल्या तर काश्मीर खोर्‍यामध्ये पुन्हा एकदा स्थानिक पंडित, शीख समुदायात आणि बिगर काश्मिरींमध्ये दहशत निर्माण करून त्यांना खोर्‍याबाहेर पडण्यास भाग पाडण्याचा दुष्ट सैतानी इरादा स्पष्ट दिसतो. परंतु यावेळी एका गोष्टीचा ह्या देशद्रोही शक्तींना विसर पडला आहे तो म्हणजे ठोशास ठोसा देणारी नीती राबवणारे सरकार केंद्रात सत्तेवर आहे. गेले दोन दिवस खोर्‍यामध्ये जी व्यापक शोधमोहीम एनआयएने राबवली त्यात दहशतवाद्यांच्या नऊशेहून अधिक समर्थकांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्यांच्याद्वारे मिळणार्‍या माहितीचे धागेदोरे जोडून ह्या हत्यासत्रामागे असलेल्या म्होरक्यांचा खात्मा करण्याच्या प्रयत्नात भारतीय लष्कर आहे.
काश्मिरी पंडित, अन्य हिंदू आणि शीख समुदायाच्या मनातील दहशत दूर करण्यासाठी लष्कराकडून प्रत्युत्तराच्या अत्यंत कठोर कारवाईची या घडीस निश्‍चितच आवश्यकता आहे. दहशतवाद्यांना कुठेही आपण वरचढ ठरल्याचे समाधान मिळता कामा नये. येत्या काळात ह्या हत्यांमागे असलेल्या द रेसिस्टन्स फ्रंटविरुद्ध फार मोठी मोहीम राबवावी लागेल. सध्याच्या हत्यांमागे पोलीस रेकॉर्ड नसलेले स्थानिक नवखे दहशतवादी आहेत. ह्या हत्यांचे खरे सूत्रधार पाकिस्तानात आहेत हेही तितकेच खरे आहे. पण लष्कर काश्मीर खोर्‍यातील प्रत्येक अल्पसंख्यकाला संरक्षण पुरवू शकणार नाही. ही जबाबदारी खरे तर बहुसंख्य काश्मिरी जनतेने उचलायला हवी. स्थानिक राजकीय नेत्यांनी नक्राश्रू ढाळण्यापेक्षा त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. काश्मीर खोरे पुन्हा देशापासून अलग पडले तर त्याची सर्वाधिक किंमत त्या जनतेलाच चुकवावी लागेल हे त्यांना कळायला हवे. काश्मिरमधील पर्यटन, व्यापार, व्यवसाय याकडे उर्वरित भारतीयांनी पाठ फिरवली तर बसणारे चटके दहशतवाद्यांच्या गोळीपेक्षाही दाहक असतील.