![INDIA-PAKISTAN-KASHMIR-ELECTION-UNREST](https://navprabha.com/wp-content/uploads/2014/12/5kashmir.jpg5_.jpg)
काश्मीरात १२ तासात ४ हल्ले ; ८ दहशतवादी ठार
पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरच्या दौर्यावर जाण्याच्या दोन दिवस आधी काल बारामुल्ला जिल्ह्यातील मोहुरा या ठिकाणी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ११ जवान शहीद झाले. काल पहाटेपासून १२ तासात दहशतवाद्यांनी मोहुरी, श्रीनगर, त्राल व शोपियान अशा चार ठिकाणी हल्ले चढवले. या धुमश्चक्रीत एक नागरिकही ठार झाला असून जवानांनी ८ दहशतवाद्यांना ठार केले.कालच्या धुमश्चक्रीत शहीद झालेल्या ११ जवानांमध्ये एका लेफ्टनंट कर्नल हुद्याच्या अधिकार्यासह तीन पोलिसांचाही समावेश आहे. लष्करी प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार काल पहाटेच्या ३ वा.च्या सुमारास बारामुल्ला तालुक्यातील मोहुरा येथील लष्करी छावणीवर अद्ययावत शस्त्रसामुग्रीने सुसज्ज दहशतवाद्यांच्या टोळीने स्वयंचलीत बंदुकांनी अंदाधुंद गोळीबार केला. लष्करी जवानांनी लगेच या हल्ल्याला प्रत्त्युत्तर दिले. परिसरातील लष्कराच्या अन्य छावण्यांशी संपर्क साधण्यात आला. याच दरम्यान एका बराकीत आग लागल्याने त्यात काही सैनिक अडकून पडले. त्यानंतर सकाळी ९.३० वा.पर्यंत ही धुमश्चक्री चालू होती. ती थांबल्यानंतर हल्लेखोर दहशतवाद्यांचे सहा मृतदेह शोधून काढण्यात आले.
पाकिस्तानने हे थांबवावे : राजनाथ
दरम्यान, राजौरी येथे बोलताना गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी हे प्रकार थांबविण्यासाठी पाकिस्तानने तातडीने पावले उचलावीत. हे थांबविण्यात पाकिस्तानला अडचण येत असल्यास त्यांनी भारताशी बोलावे. आम्ही मदतीस तयार आहोत असे ते म्हणाले. दहशतवादी पाकिस्तानमधून भारतात घुसखोरी करीत असल्याचा दावा त्यांनी केला.
निवडणुकांमुळे हे घडत असावे : पर्रीकर
दरम्यान, नवी दिल्ली येथे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या प्रकरणी भाष्य करताना काश्मीरमधील निवडणुकांमुळे दहशतवादी हल्ले झाल्याची शक्यता व्यक्त केली. जे दहशतवादी अडकून पडले आहेत त्यांचा बंदोबस्त केला जाईल असे ते म्हणाले. काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी राज्यातील शांतता नष्ट करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगून निषेध केला.
बसवर हातबॉंब फेकला
पुलवामा जिल्ह्यातील एका दहशतवादी कारवाईत एका बसवर हातबॉंब फेकण्यात आला. त्यात एक नागरीक ठार झाला, तर सहाजण जखमी झाले. भारतीय लष्कराने परिस्थितीवर नियंत्रण आणले असून दहशतवाद्यांच्या ताब्यातील ५५ काडतुसे, बंदुका, रात्रीच्यावेळी वापरावयाच्या दुर्बिणी, ४ रेडिओ सेटस्, ३२ हातबॉंब, वैद्यकीय साहित्य आदी ऐवज ताब्यात घेतला.