आमदार मायकल लोबोंना हडफडे येथे मारहाण

0
106

कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्यावर हडफडे-नागवा पंचायतचे पंचसदस्य केल्फी फर्नांडिस यांनी काल सायंकाळी (दि. ५) मारहाण करून जखमी केल्याची तक्रार हणजूण पोलीस स्थानकात देण्यात आली आहे.याबाबत आमदार लोबो यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, काल सकाळी हडफडे नागवा पंचायतच्या उपसरपंचाची निवडणूक होती त्यात पंचसदस्य केल्फी फर्नांडिस याना उपसरपंच व्हायचे होते पण त्यांना होता आले नाही आणि त्याच्या जागी रोशन रेडकर यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे सकाळपासून फर्नांडिस बैचेन होते. संध्याकाळी आमदार लोबो हे हडफडे-नागवा येथे रस्त्याचे हॉटमिक्स काम चालू असल्याच्या ठिकाणी पहाणी करत असताना फर्नांडिस यांनी आमदार लोबो यांच्याशी बाचाबाची सुरू केली आणि डोक्यांवर दंडूक्याने वार करण्याचा प्रयत्न केला. लोबो यांनी मध्ये हात घातल्याने डोक्यावरचा वार हातावर बसून हाताला गंभीर मार बसला. त्यावर त्यांना म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आणि नंतर उपचारानंतर घरी पाठविण्यात आले. यासंबंधी हणजूणचे पोलिस निरीक्षक परेरा नाईक यांना या घटने विषयी माहिती विचारली असता आमदारांना मारहाण झाल्याचे त्यांनी सांगितले पण मारहाणीमागील कारण समजू शकले नसल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत हणजूण पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली असून हणजूण पोलीस पुढील तपास करीत आहेत.