दक्षिण जिल्हा इस्पितळाच्या बांधकामाला गती देणार

0
225

>> आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणेंची माहिती

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या इमारतीच्या बांधकामाला गती देण्यात येणार असून येत्या मे २०१८ पर्यत इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
दक्षिण गोव्यातील नव्याने बांधण्यात येणार्‍या जिल्हा इस्पितळाचे काम रेंगाळत पडले आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे काम प्राधान्यक्रमाने हाती घेण्याची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी इस्पितळाच्या बांधकामाकडे गांभिर्याने लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. या इस्पितळाच्या बांधकामावर देखरेख ठेवण्यासाठी समन्वयक समितीची नियुक्ती केली जाणार आहे. इस्पितळासाठी डॉक्टर व कर्मचार्‍याच्या नियुक्तीची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे. तसेच इस्पितळासाठी लागणारी वैद्यकीय साधन सुविधा खरेदीसाठी गोवा राज्य साधन सुविधा विकास मंडळामार्ङ्गत निविदा जारी केली जाणार आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले. यावेळी नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई हेही उपस्थिती होते.