दक्षिण आफ्रिकेकडून केनिया भुईसपाट

0
106

आयसीसी अंडर १९ क्रिकेट विश्‍वचषकातील काल झालेल्या दुसर्‍या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दुबळ्या केनियाचा १६९ धावांनी मोठा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना ७ बाद ३४१ धावांचा डोंगर उभारल्यानंतर द. आफ्रिकेने केनियाला ७ बाद १७२ धावांवर रोखले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेल्या दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार रेयनार्ड व्हॅन टोंडर याने तुफानी फटकेबाजी करताना १२१ चेंडूंत १४ चौकार व ५ षटकारांसह १४३ धावांची खेळी केली. सलामीवीर जीवेशन पिल्ले (६२) याच्यासह टोंडरने दुसर्‍या गड्यासाठी १२५ धावांची भागीदारी केली. ४५व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर टोंडर सातव्या गड्याच्या रुपात बाद झाला. शेवटच्या ५ षटकांत द. आफ्रिकेने ६५ धावा चोपल्या. जेड क्लर्क (२३ चेंडूंत नाबाद २८) व जेराल्ड कोईट्‌झी (१४ चेंडूंत नाबाद ३६) यांनी केनियाच्या स्वैर मार्‍याचा पुरेपूर लाभ उठवला. विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना केनियाने सुरुवातीपासून संथ फलंदाजी केले. विजयासाठी प्रयत्न करण्याऐवजी पूर्ण षटके फलंदाजी करण्याकडे त्यांचा कल होता. यात त्यांना यशदेखील आले. परंतु, पराभवाचे अंतर मात्र वाढले. द. आफ्रिकेकडून किनन स्निथ व जसराज कुंडी यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.