क्षेपणास्त्र नौका

0
147
  • अनंत जोशी

क्षेपणास्त्र नौका आकाराने अगदी लहान असल्याने रडारवर टिपण्याची शक्यता कमी होती. तसेच या नौकेवर जे रडार बसविलेले असायचे ते इतर रडारांपेक्षा सरस असायचे. दुश्मनांच्या रडारवर न दिसणे, तसेच मोठ्या युद्धनौकांना आपल्या रडारवर टिपणे, दुसरीकडून हल्ला होण्याअगोदर त्यांच्यावर क्षेपणास्त्र हल्ला करणे आणि कोणत्याही इतर नौकांशी तुलना करता, हल्ला करून तेथून पळ काढणे या सर्व गुणांमुळे क्षेपणास्त्र नौकेची मागणी जास्त वाढली.

क्षेपणास्त्र नौका किंवा मिसाईल कट्टर ही अगदी लहानशी युद्धनौका असून यावर युद्धनौकाविरोधी क्षेपणास्त्रे तैनात असतात. लहान युद्धनौका असल्याने अशा नौका जे देश मोठ्या जहाजांची निर्मिती किंवा रखरखाव करू शकत नाहीत, अशा देशांमध्ये अतिशय प्रसिद्ध आहेत. दुसर्‍या विश्वयुद्धाच्या दरम्यान वापरण्यात आलेल्या टोरपिडो बोटीसारख्याच त्या आहेत. तसे पाहता टोरपिडो रकान्यात दोनपेक्षा जास्त क्षेपणास्त्रे बसविण्यात येतात. जसजशी मार्गदर्शन क्षेपणास्त्रे व इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्रात प्रगती होत गेली तसतशी नवी कल्पना सुचत जाऊन भेदक व अचूक मारा यावर जास्त भर देण्यात आला. आता असा विचार करण्यास प्रारंभ झाला की अशा क्षेपणास्त्रे वाहणार्‍या नौकांचा आकार असा असला पाहिजे की त्या जलद व चपळाईने शत्रूवर हल्ला बोलतील व युद्धात आपली स्थिती मजबूत करतील.

नौसेनेची युद्धकार्यक्षमता वाढविण्यासाठी फक्त शस्त्रसाठा वाढविणे एवढाच उद्देश नसून त्यांचा मारा करण्यासाठी लागणारी व्यवस्थाही असणे आवश्यक होय. त्यामुळे मोठ्या नौकांची गरज भासत होती, ज्या गोळा फेकल्यानंतर होणार्‍या कंपनांना झेलू शकतील! यामुळे दुसर्‍या महायुद्धात मोठमोठ्या युद्धनौकांची निर्मिती झाली. लहानशा एखाद्या चपळ सतहावरून क्षेपणास्त्र मारा करणे हे एखाद्या मोठ्या युद्धनौकेवरून करण्यात येणार्‍या मार्यादेपेक्षा कमी प्रतीच्या असायच्या. पण जेव्हा स्वयंचलित क्षेपणास्त्रे अस्तित्वात आली, तसे लहान नौकांचे महत्त्व वाढत गेले. जेव्हा एखादी लहान नौका एखाद्या अतिशय भेदक अशा जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनी सज्ज असते, तेव्हा ती एखाद्या मोठ्या युद्धनौकेलासुद्धा धोका पोचवू शकते. तसेच टोरपिडोपेक्षा जास्त अंतरसुद्धा तिला गाठता येते.

क्षेपणास्त्र नौकांचा शोध आणि त्यांची बांधणी पहिल्यांदा सोवियत युनियन येथे झाली. याचे मुख्य वैशिष्ट्य असे होते की हिची बांधणी अगदी निमुळती होती. त्याचे एकूण वजन २०० टन होते. इंजिन अत्यंत शक्तिशाली असल्याने ताशी ३४ समुद्री मैल वेगाने ती वावरू शकत होती. क्षेपणास्त्र नौका आकाराने अगदी लहान असल्याने रडारवर टिपण्याची शक्यता कमी होती. तसेच या नौकेवर जे रडार बसविलेले असते ते इतर रडारांपेक्षा सरस असते. दुश्मनांच्या रडारवर न दिसणे, तसेच मोठ्या युद्धनौकांना आपल्या रडारवर टिपणे, दुसरीकडून हल्ला होण्याअगोदर त्यांच्यावर क्षेपणास्त्र हल्ला करणे आणि कोणत्याही इतर नौकांशी तुलना करता, हल्ला करून तेथून पळ काढणे या सर्व गुणांमुळे क्षेपणास्त्र नौकेची मागणी जास्त वाढली व उपयोगात आणली गेली.
रशियाच्या जहाजबांधणी अभियंत्यांनी मुद्दामपणे अशा तर्‍हेच्या जहाजाचे आराखडे तयार केले, जेणेकरून अतिबलाढ्य अशा अमेरिकेच्या युद्धनौकांनी जर का रशियाच्या किनार्‍यावर हल्लाबोल केला तर या लहान नौका नक्कीच त्यांना यमसदनी पाठवतील यात तीळमात्र शंका नव्हती. त्यांची निर्मिती व आराखडा भरसमुद्रात जाण्यासाठी नसून फक्त समुद्रकिनारी गस्त घालणे आणि हल्ला करण्यासाठी होत्या. त्याचे दुसरे कारण म्हणजे त्यांच्याकडे सीमित इंधनसाठा असायचा.

या क्षेपणास्त्र नौकांचा इतिहास पाहता, या नौका अगोदर फक्त टॉरपिडो वाहून नेत असत, त्या जागेवर क्षेपणास्त्रे बसविण्यात आली. पुनश्चः सांगायचे झाल्यास, अशा लहान वेगवान नौका एखाद्या मोठ्या मुख्य युद्धनौकेवर हल्ला करू शकत होत्या. ही कल्पना पहिल्यांदा सोवियत युनियनने अमलात आणली. प्रोजेक्ट १८३ आर या संकेत नावांनी ऑगस्ट १९५७ साली त्यांनी कोमर श्रेणीतील नौका बांधल्या, ज्या ८२ फूट लांबीच्या होत्या. ज्यावर दोन पी-१५ टर्मिट क्षेपणास्त्रे बसविण्यात आली. त्याशिवाय दोन २५ एम.एम. तोफा, चार डिझेल इंजिने जी ४,८०० बीएचपी आणि त्यांचा वेग जवळपास तशी ७४ कि.मी. होता. शिवाय १२ सागरी मैल वेगाने प्रवास केल्यास एकाच वेळेस १००० सागरी मैल प्रवास त्या करू शकत असत. त्याशिवाय यावरील जी रसद असायची ती पाच दिवस पुरेल इतकी असायची. कोमर श्रेणीतील एकूण ११० नौका बांधण्यात आल्या. त्यानंतर सुधारणा करत जवळपास आणखीन ४०० नौका ओसा श्रेणीत बांधण्यात येऊन त्या रशियाने आपल्या मित्रदेशांना विकल्या.