दक्षिणेतील धोका

0
21

काही वर्षांपूर्वी केंद्रात संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असताना देशाच्या विविध शहरांतून भीषण बॉम्बस्फोटमालिका सुरू होत्या. देशात भीतीचे वातावरण होते. प्रत्येक दिवस अशाश्‍वत बनला होता. सुदैवाने नंतर सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने राष्ट्रीय तपास संस्थेच्या म्हणजे एनआयएच्या मदतीने दहशतवादाची मानगूट पकडली, त्याच्या आर्थिक नाड्या आवळल्या, ठिकठिकाणच्या मॉड्यूल्सवर देशव्यापी छाप्यांच्या कारवायांमागून कारवाया केल्या. परिणामी अगदी काश्मीरपासूनच्या दहशतवादी कारवायांवर बरेच नियंत्रण गेल्या काही वर्षांत आलेले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत दक्षिण भारतामधून बॉम्बस्फोटांच्या तुरळक बातम्या समोर येत आहेत असे दिसते, ज्यांची वेळीच दखल घेण्याची आवश्यकता आहे.
कर्नाटक, तामीळनाडू आणि केरळ या तीन राज्यांत विशेषत्वाने जिहादी प्रवृत्तींचा सुळसुळाट वाढल्याचे गेल्या काही वर्षांत सतत जाणवते आहे आणि त्याची वेळीच दखल घेतली नाही तर काट्याचा नायटा होण्यास वेळ लागणार नाही. या हालचालींची आवर्जून नोंद घ्यायचे कारण म्हणजे गेल्या महिन्यात कोईम्बतूर येथे आणि नुकताच मंगळूर येथे झालेला बॉम्बस्फोट. तीन ऑक्टोबरच्या पहिल्या कार बॉम्बस्फोटात एकजण ठार झाला, तर नुकत्याच मंगळूरमध्ये रिक्षात झालेल्या स्फोटात बॉम्ब घेऊन चाललेलाच जखमी झाला. दोन्हीही स्फोट तसे खूप मोठ्या तीव्रतेचे नव्हते, परंतु ते शेवटी बॉम्ब होते आणि दोन्हींमागे विशिष्ट धर्माच्या व्यक्तीच असल्याचे आणि त्यांचा अल कायदाशी संलग्नता सांगणार्‍या ‘अल हिंद’ या नव्या स्थानिक दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे तपासात समोर आलेले आहे. त्यामुळेच केवळ तामीळनाडू आणि कर्नाटकसाठीच नव्हे, तर आपल्या गोव्यासाठीदेखील गांभीर्याने दखल घेण्यासारख्या या घटना आहेत. हे दोन्ही स्फोट कमी तीव्रतेचे असल्याने मोठी प्राणहानी झाली नाही. परंतु काही झाले तरी हे दहशतवादी कृत्य आहे हे विसरता येत नाही. मंगळूरचा स्फोट प्रेशर कूकर बॉम्बमुळे झाल्याचे समोर आले आहे. दोन बॅटरी सेलच्या मदतीने हा गावठी बॉम्ब बनवण्यात आला होता. त्या प्रकरणातील आरोपी म्हैसूरमध्ये खोली भाड्याने घेऊन राहिला. तेथून बसने मंगळूरला आला आणि उतरून रिक्षातून या बॉम्बसह चालला असताना हा स्फोट झाला. त्याचा नेमका हेतू काय होता, त्याला कुठे स्फोट करायचा होता हे तपासात उघड होईलच. कोईम्बतूरमधील स्फोट हा तेथील संगमेश्‍वर मंदिरासमोर झाला. त्यामागेही घातपात घडवणे हाच उद्देश होता. आता हे दोन्ही स्फोट एकमेकांशी संबंधित असावेत असा संशयही बळावू लागलेला आहे, कारण मंगळूरमध्ये स्फोट घडवणार्‍याने बनावट सिमकार्ड कोईम्बतूरमधून मिळवले होते. म्हणजेच हे एखाद्या नव्या दहशतवादी संघटनेचे हस्तक असू शकतात आणि अशा घातपाती कारवायांद्वारे दहशत माजवण्याच्या प्रयत्नात असू शकतात.
गोव्यासाठी देखील ही धोक्याची घंटा आहे. यापूर्वी बर्‍याच वर्षांपूर्वी गोव्यात येऊन मिरामार, कळंगुटसह पाच ठिकाणी रेकी करून गेलेला दहशतवादी हा कर्नाटकमधूनच गोव्यात आलेला होता आणि गोव्यातून परत जाताना कर्नाटकच्या वाहतूक पोलिसांकडून योगायोगाने पकडला गेला होता. त्यामुळे सुदैवाने ते भीषण कटकारस्थान उजेडात आले आणि विफल करण्यात यश आले. यावेळी अद्याप या घातपाती कारवाया गोव्यापर्यंत येऊन थडकलेल्या जरी नसल्या, तरी येणारा पर्यटक हंगाम, नववर्ष, येथे मोठ्या संख्येने येणारे विदेशी पर्यटक आदी लक्षात घेता गोवाही या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असू शकतो. अर्थात, अद्याप कोणताही संबंध उजेडात आलेला नसल्यामुळे याबाबत नाहक भीती पसरवणे योग्य ठरणार नाही, परंतु खबरदारी घेण्याने काही नुकसान तर नक्कीच होणारे नाही. त्यामुळे गोवा पोलिसांनी सध्या कर्नाटक, तामीळनाडू आणि केरळमध्ये हे जे संशयित सापडत आहेत, त्यांची माहिती घेणे आणि त्यांचे गोव्याशी काही लागेबांधे आहेत का हे तत्परतेने शोधणे आवश्यक आहे. बांधकाम आणि तत्सम व्यवसायांच्या निमित्ताने कर्नाटकच्या या जिल्ह्यांतून हजारोंच्या संख्येने मजूरवर्ग गोव्यात येत जात असतो. त्यांच्यात अशा प्रकारच्या दहशतवादी संघटनेचे हस्तक मिसळलेले असू शकतात. विशेषतः मुसलमान समाजातील युवकांची माथी भडकावण्याचा प्रयत्न अलीकडच्या काळात सतत चाललेला आहे. गोव्याच्या शांती आणि सौहार्दाला बाधा पोहोचवणार्‍या कोणत्याही प्रकारच्या अराष्ट्रीय प्रवृत्तीला गोव्यात वाव दिला जाऊ नये. कर्नाटकपर्यंत पोहोचलेले दहशतवादाचे लोण आपल्या गोव्यापर्यंत यायला वेळ लागणार नाही.