थिवी वीज उपकेंद्रात नवीन यंत्रणा बसवणार

0
227

>> खात्यातर्फे निविदा जारी

वीज खात्यातर्फे राज्यातील प्रमुख अशा थिवी येथील वीज उपकेंद्रातील वीज यंत्रणेची अंदाजे १ कोटी ३९ लाख १६ हजार ३३५ रूपये खर्चून दुरूस्ती केली जाणार आहे. यावेळी जुनी यंत्रणा बदलून नवीन यंत्रणा बसविण्यात येणार आहे. हे दुरूस्तीचे काम एका वर्षात पूर्ण केले जाणार आहे.

थिवी हे राज्यातील एक महत्वपूर्ण वीज उपकेंद्र आहे. येथील वीज उपकेंद्रातून उत्तर गोव्यातील अनेक भागात वीजपुरवठा केला जातो. राज्यात वाढणार्‍या विजेच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी थिवी वीज उपकेंद्रातील जुनी यंत्रणा बदल्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. वीज उपकेंद्रातील यंत्रणेवर ताण येत असल्याने काही वेळा वीजपुरवठ्यावर परिणाम होतो.

थिवी वीज उपकेंद्रातील पाच ११० केव्ही सर्किट ब्रेकर्स आणि अकरा ३३ केव्ही मिनिमम ऑईल सर्किट ब्रेकर्स बदलून नवीन बसविण्यात येणार आहेत. वीज खात्याने याबाबतची निविदा ऑन लाईन पद्धतीने जारी केली आहे. या निविदेसाठी २४ ऑक्टोबर २०१७ रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ऑन लाईन पद्धतीने दि. ९ नोव्हेंबर २०१७ रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यत निविदा अर्ज स्वीकारले जाणार आहेत. दरम्यान, सरकारने राज्यातील वीजपुरवठ्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी पाच नवीन वीज उपकेंद्रे सुरू करण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. साळ, म्हापसा येथील नवीन वीज उपकेंद्राबाबत निविदासुद्धा जारी करण्यात आलेली आहे.