अफरातफर प्रकरणी चौघांना अटक
पैशांची अफरातफर केल्याच्या तक्रारीवरून काल म्हापसा पोलिसांनी थिवी कोमुनिदादीच्या चार कार्यकारी मंडळ सदस्यांना अटक केल्याने थिवी भागात खळबळ माजली आहे.
अटक केलेल्यांत कोमुनिदादीचे उपाध्यक्ष लुईस डिसोझा (६३), अटर्नी मॅथ्यू डिसोझा (६५), सहऍटर्नी आंतोनियो फोन्सेका (५७), उपखजिनदार ऍलेक्झँडर एक्ट्रेसियो (७३) यांचा समावेश आहे.
दरम्यान, जासिंतो सिक्वेरा व पीटर फोन्सेका यांचाही पोलिस शोध घेत आहे.
१३ मे रोजी ज्यूड डिलिमा, कॅलिक्स डिलिमा, नेलन डिसोझा या थिवी कोमुनिदादीच्या सदस्यांनी केलेल्या पोलीस तक्रारीत कार्यकारी मंडळ सदस्यांकडून बँक खात्यात अफरातफर झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली. ‘गावकारा’ना पैशांच्या व्यवहाराविषयी अंधारात ठेवण्यात आले होते, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे.