त्वचा विकार

0
1907
  • वैदू भरत म. नाईक

उशीरा जेवण, उपवास, कदान्न, शिळे जेवणे, पोषणाअभावी त्वचा रुक्ष होते.
भरीस भर म्हणून उन्हातान्हात, पावसात श्रमाची भरपूर कामे करणे, त्यामुळे त्वचा रुक्ष होऊन जळवात, भेगा असे विकार होतात.

केवळ त्वचाविकार फारच थोडे आहेत. बरेचसे त्वचेचे वाटणारे विकार हे यकृत, रक्त, मांस, मेद, कफ, पित्त यांच्या दुष्टीमुळे पोटातील अन्नवहस्रोतस व रसरक्ताभिसरणाची यंत्रणा बिघडल्याची वॉर्निंग देणारे त्वचेवरचे दर्शन असते. केवळ इसब, गजकर्ण, खरूज व नायटा, काळे व पांढरे डाग, मुरूम, तारुण्यपिटीका, रुक्ष व तेलकट त्वचा यांचाच विचार करत आहोत. इतर त्वचेसंबंधी विकारांचा ऍलर्जी, आग होणे, कंड, कुरूप, केसाचे विकार, कोड, गरमी, परमा, गोवर, कांजण्या, गांधी उठणे, जखमा, जळवात, नागीण, महारोग, सोरायसीस यांच्यावर स्वतंत्र लेख लिहिता येईल.
कारणे ः-
१. इसब, गजकर्ण, खरूज, नायटा
* साथ असणे, रोगी माणसाची संपूर्ण अस्वच्छ राहणी, खराब पाणी, कॉंग्रेस ग्राससारखे विषारी गवत, प्लॅस्टीक, रबर, टेरेलीन, नायलॉन अशांची पादत्राणं व कपडे.
* विषारी वायू, तेल यात काम करणे, सल्फर ड्रग घेणे.
* शरीरात कफ व पित्ताची म्हणजे पू व उष्णतेची फाजील वाढ होण्याची कारणे घडणे. थोडक्यात रक्त बिघडणे, शौचाला साफ न होणे, जंत, कृमी असणे.
* मधुमेह व स्थूलपणा होण्यास कारण असणारा खूप गोड, पचावयास जड, फाजील मीठ व आंबट पदार्थांचा वापर असणे.

२. त्वचेखाली काळे व पांढरे डाग
अ) काळे डाग ः- आंबट, खारट, दही, मिरची, लोणचे, पापड, लिंबू अशा पदार्थांच्या अतिरिक्त आहाराने पेट्रोलियम पदार्थांची गंध, साबण, सोडा यांच्या संपर्कात उघड्या त्वचेवर काळे डाग पडतात व वाढत जातात.
ब) पांढरे डाग ः- पांडुता, कृमी, जंत, जास्त मीठ किंवा आंबट पदार्थ खाणे, पोट साफ नसणे त्यामुळे त्वचेवर, गालावर, चेहर्‍यावर, हातावर पांढरे डाग उठतात. अशा कारणांनी छातीवर शिब्याचे पांढरे डाग दिसतात.

३. तारुण्यपिटीका (मुरूम, चामखीळ) ः-
* वयात येणे, त्या काळात मिरची, मसालेदार पदार्थ जास्त प्रमाणात खाणे, मुलींची मासिक पाळी साफ न होणे, गोड, आंबट पदार्थ यांचा नेहमी अधिक वापर असणे.
* वारंवार चेहर्‍यावरील त्वचेतील फोड पिकणे, हाताळणे.

४. रुक्ष व तेलकट त्वचा ः-
* शरीराचे पोषण होईल असा संतुलित प्रमाणशीर आहार नसणे.
* उशीरा जेवण, उपवास, कदान्न, शिळे जेवणे, पोषणाअभावी त्वचा रुक्ष होणे.
* भरीस भर म्हणून उन्हातान्हात, पावसात श्रमाची भरपूर कामे करणे, त्यामुळे त्वचा रुक्ष होऊन जळवात, भेगा असे विकार होतात. याउलट अतिस्निग्ध, तेलकट, तुपकट, पौष्टीक आहार खाऊन त्वचा फारच तेलकट होते.

लक्षणे ः-
(अ) इसब –
* कोरडे व ओले दोन्ही प्रकारचे असते वा नसते.
* खाज बहुधा असते. कमी-अधिक वाढते.
* पथ्याने व नेटाने उपचार केल्यास बरे वाटते. हा संसर्गिक रोग आहे.
* मीठ बंद केल्यास चटकन बरे वाटते. इसब बहुधा पायाला व हाताला होतो.
(ब) गजकर्ण – मांडीला, कानाच्या आकारासारखे व खूप खाज असणारे चट्टे येतात. खाजविल्यावर बरे वाटते. हा सांसर्गिक रोग आहे.
(क) खरूज – हाताच्या बोटांच्या बेचक्यात विशेषत्वाने होते. ओली व कोरडी दोन्ही प्रकारची खरूज फारच सांसर्गिक आहे.
(ड) नायटा – बहुधा मानेला, पाठीला, मांडीला, काखेत गोल व वेगवेगळ्या आकाराचा किंचित जाडसर चट्टा येतो. खाजविल्याने वाढतो. नखाचे विष लागल्याने अधिक वाढतो.
(इ) काळे डाग – त्वचेवर उघड्या जागी, कपाळ, हात यावर काळे डाग येणे, खाज सुटणे, वात सुटणे,
(फ) पांढरे डाग – गळ्यावर, चेहर्‍यावर, जंत, कृमी व पांडुता यामुळे व क्वचित सर्व शरीरावर निरनिराळ्या आकाराचे पांढुरके ठिपके येणे, जीभ व पोट खराब असणे, पोट साफ नसणे.
(ग) तारुण्यपिटीका (मुरूम, मुखदुषिका) – चेहर्‍यावर पुटकुळ्या येणे, लस लागणे, पुनःपुन्हा नवीन फोड येणे, फोडल्यावर काळे डाग येणे, मासिक पाळीच्या आधी वाढणे.
(घ) चामखीळ – चेहर्‍यावर विशेष करून डोळे, मान येथे गोल, मोहरीच्या दाण्याहून लहान असा फोड येऊन तो वाढणे, त्याचा काहीच त्रास न होणे, दिसावयास वाईट न दिसणे.
(च) शीबे (सिध्य, शिबले) – छाती, गळा यांवर वेगवेगळ्या आकाराचे पांढरे ठिपके, डाग येणे, वाढणे, जाणे, काही वेळेस खाज सुटणे, पांढरा कोंडा पडणे, आपोआप कमी होणे.
(छ) रूक्ष व तेलकट त्वचा ः
१. रुक्ष त्वचा ः विशेषतः चेहरा, उघडे हातपाय, कोरडे-कोरडे रसरंगहीन सुरकुत्या असलेले मलीन असे दिसणे.
२. तेलकट त्वचा ः विशेषतः चेहरा. हातपाय, फाजील तेलकट दिसणे, घाम जास्त येणे, घामास वास येणे, लघवी खूप व गढूळ होणे.

पथ्यापथ्य ः-
१. मीठ व आंबट पदार्थ हे सर्व त्वचाविकाराकरीता वर्ज्य असावेत.
२. मसालेदार पदार्थ, अंडी, मांसाहार, बेकरीतील पदार्थ, दही कधी खाऊ नये.
३. आंघोळ करताना डाळीचे पीठ वापरावे, साबण वापरू नये.
४. साबणाऐवजी शिकेकाई, नागरमोथा, आवळकठी, कागदी लिंबू, साळ यांचे चूर्ण उकळून त्याने केस धुवावेत,
५. नायलॉन, टेरलीन, प्लास्टिक, कृत्रिम धाग्यांचे वस्त्र व जोडे वापरू नयेत.
६. उकडलेल्या भाज्या, मूग, दोडका, पडवळ, कारळे, कोहळा, खुरडा, लसूण, कोथिंबीर, जुने तांदूळ, ज्वारी हे पदार्थ पथ्यकर आहेत. मसूर, तूर, बाजरी, लोणचे, पापड हे पदार्थ अपथ्यकर आहेत.