त्रिनबागो नाईट रायडर्सची विजयी दौड सुरूच

0
132

>> बार्बेडोस ट्रायडंटस्‌समोर जमैका तलावाहज्‌ची शरणागती

बार्बेडोस ट्रायडंटस् व त्रिनबागो नाईट रायडर्स यांनी अनुक्रमे जमैका तलावाहज् व सेंट लुसिया झूक्स यांचा पराभव केला. कॅरेबियन प्रीमियर लीगमधील हे सामने त्रिनिदादमधील क्वीन्स पार्क ओव्हलवर खेळविण्यात आले.
गुरुवारी झालेल्या स्पर्धेतील १४व्या सामन्यात बार्बेडोस ट्रायडंटस्‌समोर जमैका तलावाहज्‌ने शरणागती पत्करली. १४९ धावांचे माफक लक्ष्य असताना त्यांना ९ बाद ११२ पर्यंतच पोहोचता आले. काईल मायर्स याने केवळ ५९ चेंडूंत ८ षटकार व ३ चौकारांसह जमवलेल्या ८५ धावा व त्याने जेसन होल्डरसह तिसर्‍या गड्यासाठी केलेल्या ६३ धावांच्या भागीदारीच्या जोरावर बार्बेडोसने निर्धारित २० षटकांत ७ बाद १४८ धावा फलकावर लगावल्या. मायर्सव्यतिरिक्त केवळ होल्डर (१५) व सेंटनर (नाबाद २०) यांना दुहेरी धावसंख्या करता आली. जॉन्सन चार्ल्स (३), शेय होप (८), राशिद खान (०), कोरी अँडरसन (१) यांनी खेळपट्टीवर राहण्याची तसदी घेतली नाही. तलावाहज्‌कडून मुजीब रहमान याने आपल्या ४ षटकांत केवळ १४ धावा मोजून ३ गडी बाद केले. नेपाळच्या संदीप लामिछाने याने १६ धावांत २ बळी घेत त्याला सुरेख साथ दिली.
माफक लक्ष्य असताना तलावाहज्ला पहिल्याच षटकात सेंटनरने पहिला धक्का दिला. संघाचे खाते उघडण्यापूर्वीच ग्लेन फिलिप्स (०) याचा त्रिफळा उडाला. चॅडविक वॉल्टनने एक चौकार व १ षटकार लगावून चांगली सुरुवात केली होती. परंतु, होल्डरच्या अचूक मार्‍यासमोर त्याचा टिकाव लागला नाही. मधल्या फळीत रोव्हमन पॉवेल (१२ चेंडूंत ४), आसिफ अली (१० चेंडूंत २), वीरसामी परमॉल (१२ चेंडूंत ३) यांनी इतर फलंदाजांवर दबाव वाढविण्याचे काम करतानाच आपल्या विकेटस् फेकल्या. जर्मेन ब्लॅकवूड (२८ चेंडूंत २८) व एनक्रुमा बोनर (२८ चेंडूंत ३१) यांनी थोडेफार योगदान दिले. पण, त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. ट्रायडंटस्‌कडून होल्डर, सेंटनर, रिफर व राशिद यांनी प्रत्येकी २ तर हेडन वॉल्शने १ बळी घेतला.
तत्पूर्वी, बुधवारी झालेल्या स्पर्धेतील १३व्या सामन्यात त्रिनबागोचा कर्णधार कायरन पोलार्ड याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पावसाने बाधित झालेल्या या लढतीत झूक्सची सुरुवात खराब झाली. यष्टिरक्षक फलंदाज आंद्रे फ्लेचर केवळ १० धावांचे योगदान देऊ शकला. यानंतर ड्वेन ब्राव्होने धोकादायक ठरू शकणार्‍या कॉर्नवालला बाद करत झूक्सला दुसरा धक्का दिला. तिसर्‍या स्थानावर उतरलेल्या मार्क दयाल याला धावांसाठी संघर्ष करावा लागला. फवाद अहमद व ड्वेन ब्राव्हो यांनी दयालला जखडून ठेवत धावगतीला ब्रेक लगावला. तब्बल २३ चेंडू खेळूनही त्याला केवळ १६ धावा करता आल्या.
भरवशाचा अष्टपैलू रॉस्टन चेज (७) अपयशी ठरल्याची जबर किंमत त्यांना मोजावी लागली. अफगाणिस्तानच्या नजिबुल्ला झादरान (२१ चेंडूंत २१) व डॅरेन सॅमी (७ चेंडूंत २ धावा) यांना वेगाने फटकेबाजी करता आली नाही. मोहम्मद नबीने २२ चेंडूंत नाबाद ३० धावा चोपल्याने झूक्सला शतकी वेस ओलांडता आली नाही. ड्वेन ब्राव्होने भेदक मारा करत आपल्या ३ षटकांत केवळ ७ धावा मोजून २ गडी बाद केले. यात ११ निर्धाव चेंडूंचा समावेश होता. झूक्सने १७.१ षटकांत ६ बाद १११ धावांपर्यंत मजल मारल्यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे त्यांचा डाव पूर्ण होऊ शकला नाही.
डकवर्थ लुईस नियमाचा आधार घेत त्रिनबागोसमोर विजयासाठी ९ षटकात ७२ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. आव्हानात्मक लक्ष्य असताना त्रिनबागोची सुरुवात भयावह झाली. लेंडल सिमन्स (०) व टियोन वेबस्टर (५) तसेच कायरन पोलार्ड (४) यांना खेळपट्टीवर तग धरता आला नाही.

कॉलिन मन्रोने केवळ ८ चेंडूंत २ चौकार व १ षटकारासह झटपट १७ धावा जमवल्या. डॅरेन ब्राव्होने १३ चेंडूंत २ गगनचुंबी षटकारांसह नाबाद २३ धावा करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

टिम सायफर्टने नाबाद १५ धावा करत त्याला चांगली साथ दिली. या विजयासह त्रिनबागोने आपली अपराजित दौड कायम राखत ४ सामन्यांतून आपली गुणसंख्या ८ केली.

संक्षिप्त धावफलक
सेंट लुसिया झूक्स ः १७.१ षटकांत ६ बाद १११ (मोहम्मद नबी नाबाद ३०, नजिबुल्ला झादरान २१, रहकीम कॉर्नवाल १८, मार्क दयाल १६, ड्वेन ब्राव्हो ७-२, प्रवीण तांबे १५-१, खारी पिएर १९-१, अली खान २१-१) पराभूत वि. त्रिनबागो नाईट रायडर्स ः (लक्ष्य ९ षटकांत ७२) ९ षटकांत ४ बाद ७२ (ड्वेन ब्राव्हो नाबाद २३, टिम सायफर्ट १५, केसरिक विल्यम्स १७-२, मोहम्मद नबी १५-१, शेमार होल्डर २१-१)

बार्बेडोस ट्रायडंटस् ः २० षटकांत ७ बाद १४८ (कायल मायर्स ८५, जेसन होल्डर १५, मिचेल सेंटनर नाबाद २०, मुजीब रहमान १४-३, संदीप लामिछाने १६-२, फिडेल एडवर्डस् २५-१, कार्लोस ब्रेथवेट ४५-१) वि. वि. जमैका तलावाहज् ः २० षटकांत ९ बाद ११२ (जर्मेन ब्लॅकवूड २८, एनक्रुमा बोनर ३१, मुजीब रहमान १८, मिचेल सेंटनर १०-२, जेसन होल्डर १८-२, हेडन वॉल्श १७-१, राशिद खान ३३-२, रेयमन