‘त्या’ ४२ विमान प्रवाशांना गोमेकॉत आणणार

0
173

>> आरोग्यमंत्री राणेंची माहिती

>> गोमेकॉत ५ संशयित रुग्ण

गोव्यात कोरोना विषाणूंचा फैलाव होऊ नये यासाठी आरोग्यखाते सध्या युद्धपातळीवर काम करीत आहे. दुबईहून गोवामार्गे बेंगलोरला गेलेल्या एका महिलेची बेंगलोर विमानतळावर केलेल्या तपासणीत तिला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. त्यानंतर या महिलेच्या संपर्कात आलेल्या एकूण ४२ सहप्रवाशांना गोमेकॉतील कोरोनासाठीच्या विभागात निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती काल आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यातील ३० प्रवाशांची माहिती मिळवली असून त्यापैकी ५ जणांना यापूर्वीच गोमेकॉत आणून दाखल करण्यात आले आहेत. तर ८ जणांची माहिती अद्याप मिळाली नसल्याचे ते म्हणाले. या घडीला आरोग्यखाते कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही. कोरोनामुळे सुट्टी असल्याने कर्नाटक व महाराष्ट्र या शेजारच्या राज्यातून मोठ्या संख्येने लोक गाड्या घेऊन गोव्यात सहलीसाठी येऊ लागले आहेत. हे पर्यटकही आरोग्य खात्याचा स्कॅनरवर असल्याचे राणे म्हणाले. या लोकांनी अशा आणीबाणीच्या काळात गोव्यात येऊ नये अन्यथा कोरोनाच्या संकटात वाढच होणार असल्याचे ते म्हणाले.

विदेशी पर्यटकांवर खास नजर
विदेशी नागरिकांवर सध्या खास नजर ठेवण्याची गरज असून मंगळवारी रात्रौ आपण दाबोळी विमानतळावर जाऊन दुबईहून आलेल्या विमानातून उतरलेल्या पर्यटकांचे विमानतळावर व्यवस्थितपणे स्क्रिनिंग करण्यात येते की नाही याची पाहणी केली. बुधवारी रात्रीही दुबईहून विमान येणार असून त्यामुळे आज रात्रीही (काल बुधवारी) आपण विमानतळावर जाऊन पाहणी करणार असल्याचे ते म्हणाले. विदेशांतून गोव्यात येणार्‍या पर्यटकांवर कसे लक्ष ठेवावे हे एक मोठे आव्हान ठरल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विदेशातून येणार्‍या सर्व पर्यटकांचे स्क्रिनिंग करून ज्यांना ताप अथवा सर्दी झाल्याचे आढळून येईल अशांना गोमेकॉत दाखल करून त्यांना तेथे निरिक्षणाखाली ठेवण्यात येईल, असे राणे यांनी नमूद केले.

रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी गोव्यातच तात्काळ करता याावी यासाठी गोमेकॉत प्रयोगशाळा सुरू करण्यासाठीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दोन खासगी कंपन्यांशी त्यासंबंधीची बोलणी चालू असून या कंपन्यांनी प्रयोगशाळा उभारण्याची तयारी दाखवली असल्याची माहितीही राणे यांनी दिली. गोमेकॉचे डीन शिवानंद बांदेकर यांना त्यासंबंधीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे ते म्हणाले.

मॉल्सही बंद करण्याचा विचार
दरम्यान, सिनेमागृहे, कॅसिनो, विद्यालये या पाठोपाठ आता राज्यातील मॉल्सही बंद करण्याचा विचार असल्याचे राणे यानी सांगितले. शिगमोत्सवाविषयी विचारले असता मिरवणुकांचे आयोजन केले जाऊ नये, असे आपणाला वाटत असल्याचे मत आपण यापूर्वीच व्यक्त केले असल्याचे ते म्हणाले.

२ लाख मास्कची खरेदी
राज्यात मास्कचा तुटवडा निर्माण झालेला असून सरकार दोन लाख मास्क खरेदी करणार असल्याची माहितीही राणे यांनी दिली.

संशयितांच्या हातावर शिक्का
यापुढे राज्यात जे जे संशयित रुग्ण आढळून येतील त्यांच्या हातावर शिक्का मारण्यात येणार आहे. महाराष्ट्र व अन्य काही राज्याती ते यापूर्वीच सुरू केले असल्याचे राणे यांनी नमूद केले.

थर्मल स्कॅनरची लवकरच खरेदी
रुग्णांची विमानतळ व रेल्वेस्थानकांवर तसेच बंदरावर तपासणी करण्यासाठी किमान १० थर्मल स्कॅनर्सची गरज असून ते लवकरात लवकर खरेदी करण्यात येणार आहेत. १० ते ३० लाख रुपयेपर्यंत या स्कॅनर्सची किंमत आहे.

जनतेसाठी चॅटबॉट सेवा
कोरोनाविषयीची सविस्तर अशी सगळी माहिती जनेतला मिळावी यासाठी कोबोट-१९ (उेलेीं-१९-र उजतखऊ-१९) ही चॅटबॉट सेवा लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे यावेळी आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. तंत्रज्ञानाच्या आधारे या चॅटबॉटवर जनेतला कोरोनाविषयीची सगळी माहिती मिळून जागृती निर्माण होईल. +९१७९४८०५८२१८ हा वॉट्‌सऍप क्रमांक सेव्ह करावा लागेल. त्यावर ही चॅटबॉट सेवा उपलब्ध होणार आहे.

सीमा सील करण्याचा प्रस्ताव नाही ः मुख्यमंत्री
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या सीमा सील करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना आगशी येथे काल दिली.
कोविड-१९ च्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील जिल्हा पंचायत निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा माजी मंत्री विजय सरदेसाई व इतरांकडून केली जात आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, जिल्हा पंचायत निवडणूक पुढे ढकलण्याची गरज नाही, राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून आवश्यक उपाययोजना हाती घेण्यात येत आहे. तसेच, कोरोनाची लागण झालेला एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे कोरोनाबाबत कुणीही चिंता करण्याची गरज नाही. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त व अधिकार्‍यांशी या विषयावर चर्चा करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. राज्यात अन्नधान्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे. मास्क व सॅनिटायझर्सचा तुटवडा नाही. मात्र, गरज असलेल्या व्यक्तींनी मास्कचा वापर करण्याची गरज आहे, असेही मुख्यमंत्र्यांंनी सांगितले.

राजकीय नेत्याला बाधा?
गोव्यातील एका आघाडीच्या राजकीय नेत्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय असून या नेत्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असल्याची माहिती राणे यांनी दिली. याबाबतचा तपशील देण्यास त्यांनी नकार दिला.

बंदीचा काळ वाढू शकतो
विद्यालये, सिनेमागृहे, कॅसिनो, स्पा आदी ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला असला तरी हा बंदीचा काळ वाढू शकतो, असा खुलासाही काल राणे यांनी केला. दरम्यान, काही ‘स्पा वाल्यांनी’ बंदी असतानाही आपले ‘स्पा’ चालू ठेवलेले असून त्यांचे परवाने रद्द केले जातील, असा इशाराही त्यांनी दिला.