धारगळ ॲसिड हल्ला प्रकरण; संशयिताची दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी
धारगळ येथे एका 17 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर ॲसिड फेकल्याचे प्रकरण राज्यात गाजत असून, पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी संशयित नीलेश देसाई (46, रा. कळणे-दोडामार्ग) याने जे आरोप केले होते ते फेटाळले असून, सदर मुलगीच एकतर्फी प्रेमातून आपल्या मुलाचा छळ करत होती, असा प्रतिआरोप केला आहे. दरम्यान, या प्रकरणी नीलेश देसाई याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर पीडित मुलाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
ॲसिड हल्ल्यातील पीडित मुलाच्या वडिलांनी केलेल्या दाव्यानुसार, संशयिताची मुलगी व पीडित मुलगा हे दोघेही म्हापशातील एका महाविद्यालयात एकत्र शिक्षण घेत होते. तिथेच त्यांची मैत्री जुळली. सदर मुलगी अनेक वेळा आपल्या मुलाला एसएमएस पाठवत होतील. एकदा तर ती आपल्या घरापर्यंत पोहोचली होती. त्यावेळी तिने पीडित मुलाच्या आईसमोर आपण एकतर्फी प्रेम करत असल्याचे कबूल केले होते. त्यावेळी तिची समजूत काढून तिला घरी पाठवून दिले होते. अधूनमधून रात्री-अपरात्री सदर मुलगी आपल्या मुलाला मोबाईलद्वारे वेगवेगळे संदेश पाठवून धमकी देत होती. आपण जीव संपवणार, आपण विष घेणार अशी धमकी ती देत होती, असा दावा पीडित मुलाच्या वडिलांनी केला आहे.
सदर मुलीचा गोमेकॉत उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर संशयित आणि त्याच्या मावशीने सिंधुदुर्गातील पोलीस स्थानकात आमच्या विरोधात तक्रार नोंदवली होती. त्यावेळी सदर मुलगी कशा प्रकारे संदेश पाठवून धमकी देत होती याचे पुरावे सादर केले होते, असा दावाही पीडित मुलाच्या वडिलांनी केला आहे.
दरम्यान, नीलेश देसाई याच्या शरीरावर ॲसिडचे पुरावे शोधण्यासाठी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. संशयिताचे हेल्मेट, रेनकोट आणि दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. दुचाकीवर ॲसिड आढळून आले होते.
औद्योगिक वसाहतीतील कंपनीतून चोरले ॲसिड
संशयित नीलेश देसाई हा करासवाडा औद्योगिक वसाहतीतील एका उद्यानात कामाला होता. तेथील एका काच निर्मिती कंपनीतून त्याने पाच लिटरचा ॲसिडचा कॅन चोरून आणला होता. या प्रकरणी म्हापसा पोलीस स्थानकात त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.