टीव्हीके पक्षाचा आरोप, स्वतंत्र तपासाची मागणी
तामीळनाडूमध्ये अभिनेता व तमिलगा वेत्री कझगम (टीव्हीके) पक्षाचे प्रमुख जोसेफ विजय यांच्या करूर येथील सभेत शनिवारी झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल 39 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनेकजण गंभीर जखमी झाले. विजय यांच्या टीव्हीके पक्षाने या चेंगराचेंगरीबाबत वेगळीच शंका उपस्थित करत या चेंगराचेंगरीमागे कटकारस्थान असून या घटनेचा स्वतंत्र तपास करण्यात यावा यासाठी विजय यांचा पक्ष न्यायालयात दाद मागणार आहे.
दरम्यान, या भीषण घटनेनंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपये मदत जाहीर केली आहे.
प्रचंड गर्दी आणि विजय यांचे सभास्थळी उशिरा झालेले आगमन यामुळे ही चेंगराचेंगरी झाल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र ही दुर्घटना आकस्मिकपणे नाही तर पूर्ण कटकारस्थान रचून घडवून आणण्यात आली, असा आरोप टीव्हीके पक्षाने केला आहे. तसेच उपस्थित गर्दीवर दगडफेक करण्यात आली असाही आरोप करत पक्षाने पोलिसांनी केलेल्या लाठीमाराबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दरम्यान, जखमींच्या उपचाराची जबाबदारी टीव्हीके पक्षाने घेतली असल्याचे विजय यांनी म्हटले आहे.