त्यांना न्याय द्या

0
75

झुआरीनगरमधील झुआरी ऍग्रो केमिकल्स लि. या कारखान्याच्या टाकीचे दुरुस्तीकाम सुरू असताना स्फोट होऊन तीन कामगार मृत्युमुखी पडण्याची नुकतीच घडलेली घटना दुर्दैवी आहे. नुकताच आपण कामगार दिन साजरा केला. मात्र, औद्योगिक कामगारांच्या सुरक्षेप्रती आपण खरोखर सजग आहोत का असा प्रश्न या दुर्घटनेमुळे निर्माण झाला आहे. कोणतीही दुर्घटना ही जाणूनबुजून केलेली नसते हे जरी खरे असले तरीही ज्या प्रकारे हे कामगार मृत्युमुखी पडले ते योग्य खबरदारी घेतली असती तर टाळता आले असते हे प्रथमदर्शनीच दिसून येते आहे हेही तितकेच खरे आहे. मृत्युमुखी पडलेले तिन्ही कामगार हे संबंधित कंपनीचे कर्मचारी नाहीत. ते कंत्राटदाराच्या हाताखाली काम करणारे कंत्राटी कामगार आहेत. संबंधित कंत्राटदार बाहेरचा आहे. मरण पावलेल्या तिघांपैकी एक पश्‍चिम बंगालचा, दुसरा बिहारचा, तर तिसरा पंजाबचा आहे. हे सर्व बिगरगोमंतकीय असल्यामुळे या दुर्घटनेवर पडदा ओढून हे प्रकरण दडपले जाण्याचीही मोठी शक्यता आहे. त्यामुळे ह्या दुर्घटनेस कोण जबाबदार आहेत, कोणामुळे पुरेशी खबरदारी घेतली गेली गेली नाही याचा योग्य तपास करणे आणि मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देणे हे राज्य सरकारचे कर्तव्य ठरते. टाकीच्या दुरुस्तीसाठी कोल्ड वर्क तंत्रज्ञान वापरण्यास सांगितले गेले असता त्याऐवजी हॉट वर्क गॅस कटिंग केले असे व्यवस्थापन म्हणते आहे. मग हा दोष कोणाचा? केवळ कंत्राटदाराचा की त्याला परवानगी नसलेल्या तंत्रज्ञानाद्वारे काम करू देणार्‍या कारखाना व्यवस्थापनाचा? वेगळी पद्धत अवलंबिणे घातक ठरू शकते व एखादेवेळेस प्राणांवरही बेतू शकते, याची जाणीव संबंधित कंत्राटदाराला व कामगारांना करून देणे ही मुळात कंपनी व्यवस्थापनाची जबाबदारी होती. त्यामुळे कामगार कंत्राटी होते म्हणून त्यांना यापासून हात झटकता येणार नाहीत. मृत्यू पावलेले कामगार स्फोटानंतर तीस मीटर दूर फेकले गेले, एवढा हा जबरदस्त स्फोट होता. या स्फोटास कोणाचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरला याची चौकशीही तितक्याच गंभीरपणे व्हायला हवी.
औद्योगिक कामगारांची सुरक्षा हा विषय ज्या गांभीर्याने घेतला जायला हवा तेवढा तो घेतला जाताना दिसत नाही. वास्तविक गोवा कंट्रोल ऑफ इंडस्ट्रीयल मेजर ऍक्सिडेंट हझार्डस् रूल्स १९९३ खाली सविस्तर नियमावली कागदोपत्री दिली गेलेली आहे. गरज आहे ती तिचे योग्य पालन बड्या कारखान्यांमधून होते आहे ना याची खातरजमा करण्याची. कुठे तरी कोणाकडून तरी निष्काळजीपणा होतो आणि मग औद्योगिक दुर्घटना घडतात. दोन तीन वर्षांपूर्वी तुये औद्योगिक वसाहतीतील सिमेंट कारखान्यात अशाच प्रकारे स्फोट होऊन डझनभर कामगार जखमी झाले होते.
वेळोवेळी राज्य विधानसभेमध्ये औद्योगिक सुरक्षेचा विषय चर्चिला गेलेला आहे. राज्यातील औद्योगिक दुर्घटनांमध्ये वेर्णे औद्योगिक वसाहतीचा पहिला क्रमांक लागतो. त्या खालोखाल कुंकळ्ळी आणि नंतर कुंडई औद्योगिक वसाहतीचा क्रमांक येतो. ज्या झुआरीनगरच्या कारखान्यात परवाचा स्फोट घडला, तो ज्या मुरगाव तालुक्यात येतो, तेथे अशा प्रकारच्या अनेक दुर्घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. नाफ्ता अग्निकांडाने माजवलेला हलकल्लोळ तर विसरता न येणारा आहे. झुआरी ऍग्रो, इंडियन ऑईल, हिंदुस्थान पेट्रोलियम आदींच्या बड्या रसायन साठवणुकीच्या टाक्या वास्को परिसरात आहेत. त्यामधून इंधनाबरोबरच फर्नेस ऑईल, सल्फरिक, फॉस्फरिक ऍसिड, अमोनिया, नाफ्ता आदीची साठवणूक मोठ्या प्रमाणावर केलेली आहे. येथे एखादी बडी दुर्घटना घडली, वायूगळती झाली किंवा अग्निकांड झाले तर आजूबाजूच्या लोकवस्तीतील हजारो लोकांच्या प्राणांवर बेतू शकते. त्यामुळे दुर्घटना घडू नयेत, सुरक्षित, निर्धोक वातावरणात उद्योग चालावेत याची खबरदारी प्रशासनाने घेतली पाहिजे. त्यासाठी वारंवार सुरक्षा कवायती, कर्मचार्‍यांना व नागरिकांना प्रशिक्षण, अग्निशमन प्रात्यक्षिके आदी गोष्टी व्हायला हव्यात. त्या नियमांनुसार होत असतील अशी अपेक्षा आहे. अशा प्रकारची दुर्घटना घडून गेल्यानंतर तरी अशा गोष्टींची पुनरावृत्ती कदापि होऊ नये याची खातरजमा करण्यासाठी काही कडक नियम लागू केले गेले पाहिजेत. कंत्राटी कामगार आहेत, परप्रांतीय आहेत म्हणजे त्यांचे प्राण स्वस्त आहेत असा त्याचा अर्थ नाही. औद्योगिक कर्मचार्‍यांना दुर्घटनेनंतर जे आर्थिक लाभ मिळतात ते ह्या कंत्राटी मजुरांच्या वारसांनाही मिळाले पाहिजेत. त्यांच्या कुटुंबीयांना योग्य नुकसान भरपाई दिली जावी. ते परप्रांतीय असले तरी शेवटी माणसे आहेत. कुटुंबांचा कमावता आधार आहेत. त्यांच्या वारसांना वार्‍यावर सोडले जाऊ नये.