तोतया नौदल अधिकार्‍याला अटक

0
87
संशयित तोतया अधिकार्‍यासमवेत उपनिरीक्षक विलेश दुर्भाटकर व पोलीस कर्मचारी. (छाया : शेखर वायंगणकर)

पाच दिवसांची पोलीस कोठडी
वेरे येथील आयएनएस मांडवी नौदल दलाच्या कार्यालयात अनधिकृतपणे घुसणार्‍या तोतया नौदल अधिकार्‍याला नौदलाच्या दक्ष रक्षकांनी संशयावरून ताब्यात घेऊन पर्वरी पोलिसांच्या स्वाधीन केले.
काल म्हापसा येथील न्याय दंडाधिकार्‍यांनी या दोघांनाही पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, दि.१७ रोजी अमरजीतसिंग नावाच्या व्यक्तीने नौदल अधिकार्‍याचा गणवेश परिधान करून आयएनएस मांडवी दलाच्या गेटवरील रक्षकांना आपण नौदल अधिकारी असल्याची बतावणी करून आत प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न केला असता सुरक्षा रक्षकांनी त्याला संशयावरून ताब्यात घेऊन वरिष्ठांना कल्पना दिली. त्याच्यासोबत काणका, म्हापसा येथील महेश ठाकूर हा व्यक्ती होता.
सदर तोतया अधिकार्‍याने ठाकूर याला आयएनएस मांडवी तळावरील अधिकारी असल्याचे सांगून त्याच्या मुलाला नौदल तळावरील केंद्रीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचा वादा केला होता. त्यानुसार ठाकूर याला बरोबर घेऊन अमरजित आला असता गेटवरील रक्षकांनी त्याला ताब्यात घेऊन गुन्हा अन्वेषण, सैन्य आणि नौदल अधिकार्‍यांना बोलावून चौकशी केली. अमरजीत सिंगजवळ बोगस नौदल ओळखपत्र आणि अंगावर नौदल अधिकार्‍याचा गणवेश होता.
लेफ्ट. कमांडंट ए. एस. रंधवा यांनी पर्वरी पोलीस स्थानकात यासंबंधीची तक्रार नोंदविली असून पोलिसांनी अमरजीतसिंग विरुद्ध भा. दं. सं. १४०, ४१९, ४६५, ४६८, ४६९ (३४) अन्वये गुन्हा दाखल केला असून अमरजीतसिंग आणि महेश ठाकूर यांना अटक केली
आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक ब्रेंडन डिसोझा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विलेश दुर्भाटकर पुढील तपास करीत आहेत.