तेर साहाक्यान सामवेल ठरला विजेता

0
109

>> दुसरी गोवा आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर्स खुली बुद्धिबळ स्पर्धा

अर्मेनियाचा ग्रँडमास्टर तेर साहाक्यान सामवेल याने गोवा बुद्धिबळ संघटनेने आयोजित केलेल्या दुसर्‍या गोवा आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर्स खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. काल मंगळवारी झालेल्या शेवटच्या फेरीत त्याने जॉर्जियाचा ग्रँडमास्टर जोशुआ डेव्हिट याचा पराभव केला. ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या दहा फेर्‍यांअंती तीन ग्रँडमास्टर्सचे समान ८ गुण झाले. परंतु, सरस टायब्रेकरवर सामवेल याने बाजी मारली. स्पर्धेत बहुतांशी आघाडी राखलेल्या पेट्रोस्यान मानुएल याला दुसर्‍या स्थानी समाधान मानावे लागले. स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीचा विजेता इदानी पौया तिसर्‍या स्थानी राहिला.

अव्वल ४० खेळाडूंत स्थान मिळविणारा ग्रँडमास्टर अनुराग म्हामल हा एकमेव गोमंतकीय खेळाडू ठरला. त्याने ६.५ गुणांसह ३५वा क्रमांक आपल्या नावे केला. अखेरच्या फेरीत त्याने रित्विज परब (९४ वे स्थान) याला पराजित केले. रित्विजने आपल्या मोहिमेची सांगता ५.५ गुणांसह केली. गोव्याचा तेरा वर्षीय युवा स्टार लिऑन मेंडोंसा याने ग्रँडमास्टर इनियान पी. याला पराभवाचा डोस पाजला. लिऑन ४२व्या स्थानी राहिला. नीरज सारिपल्ली (५.५ गुण, ९७वे स्थान), नंदिनी सारिपल्ली (५ गुण, १०७वे स्थान) तर फिडे मास्टर नितीश बेलुरकर (४.५ गुण, १४६वे स्थान) यांनी चांगले प्रदर्शन केले.

स्पर्धेसाठी अव्वल मानांकन लाभलेल्या इतुरिझागा एदुआर्दो या व्हेनेझुएलाच्या खेळाडूला १२व्या स्थानी समाधान मानावे लागले. भारताचा सर्वांत युवा ग्रँडमास्टर गुकेश डी. याने दहावे स्थान मिळवून सनसनाटी कामगिरी केली.

बक्षीस वितरण समारंभाला क्रीडामंत्री मनोहर आजगावकर, वीजमंत्री नीलेश काब्राल, धेंपो उद्योगसमुहाच्या कार्यकारी अध्यक्ष पल्लवी धेंपे, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे संयुक्त महाव्यवस्थापक गगन मलिक, फिडे व अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे उपाध्यक्ष डी.व्ही. सुंदर, महासंघाचे सचिव भारत सिंह चौहान, मुख्य लवाद गोपाकुमार, स्पर्धा संचालक किशोर बांदेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात बोलताना स्पर्धा संचालक व अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे खजिनदार किशोर बांदेकर यांनी राज्य सरकारचे आभार मानले. स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीसाठी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा पाठिंबा लाभला होता. यावेळीदेखील डॉ. सावंत यांच्या सरकारच्या सहाकार्याने स्पर्धा यशस्वी झाल्याचे ते म्हणाले. गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नीलेश काब्राल यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. प्रतिकुल परिस्थितीतून वाट काढण्याची त्यांची वृत्ती प्रशंसनीय असल्याचे बांदेकर शेवटी म्हणाले. नीलेश काब्राल यांनी यावेळी सर्व सहभागी ग्रँडमास्टर्सचे विशेष आभार मानताना गोमंतकीयांनी मिळविलेले १३ नॉर्म्स स्पर्धेच्या यशस्वीतेचे ध्योतक असल्याचे प्रतिपादन केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा बुद्धिबळ संघटनेच्या चढत्या आलेखाचा उल्लेख करत १३०० खेळाडूंना घेऊन भव्यदिव्य अशा स्पर्धा आयोजनाचे कौतुक केले. गोमंतकीय युवांनी मोठ्या प्रमाणात बुद्धिबळ खेळ खेळावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सरकारकडून मदत म्हणून २० लाख रुपयांचा धनादेश त्यांनी श्री. काब्राल यांना दिला. क्रीडामंत्री बाबू आजगावकर, अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे सचिव भारत सिंह चौहान यांची समयोचित भाषणेदेखील झाली.

वैयक्तिक बक्षिसे ः सर्वोत्तम गोमंतकीय खेळाडू ः मंदार लाड, ऋषिकेश परब व जॉय काकोडकर, मुलगे ः १५ वर्षांखालील ः अथर्व नीतिन नारायण, आयुष शिरोडकर, शरथ शानभाग, १३ वर्षांखालील ः सिद्धीराज गावकर, जुगन रॉड्रिगीस, लव काकोडकर, ११ वर्षांखालील ः एड्रिक वाझ, सुयश नाईक गावकर, रोहित गावस, ९ वर्षांखालील ः साईजा देसाई, वरद देसाई, कनिष्क सावंत, ७ वर्षांखालील ः अभिर प्रभू, साईराज नार्वेकर, इथन सिल्वेरा, मुली ः १५ वर्षांखालील ः सयुरी नाईक, साईनी सावंत, श्‍वेता सहकारी, १३ वर्षांखालील ः वरदा देसाई, सान्वी नाईक गावकर, पवित्रा नायक, ११ वर्षांखालील ः अश्मिता रे, शौर्या पेडणेकर, सानी गावस, ९ वर्षांखालील ः सय्यद मैझा, जेनिसा सिकेरा, तनाया डिसिल्वा, ७ वर्षांखालील ः श्रेयशी फळदेसाई, जेनसिना सिकेरा, अश्‍लेषा नायक.

स्पर्धेला मनोहर पर्रीकरांचे नाव…
गोवा आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर्स खुली बुद्धिबळ स्पर्धा पुढील वर्षापासून ‘स्व. श्री. मनोहर पर्रीकर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा’ म्हणून ओळखली जाणार आहे, अशी घोषणा नीलेश काब्राल यांनी केली. गोव्यातील क्रीडा क्षेत्रासाठी श्री. पर्रीकर यांनी मोठे कार्य केले आहे. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्पर्धेचे नामकरण करण्यात आल्याचे काब्राल यांनी सांगितले.