तेरेखोल नदीत बेकायदा रेती काढणार्‍या १४ होड्या जप्त

0
96

राज्यात बेकायदा रेती उपसा करणार्‍यांविरुद्ध सरकारने जोरदार ’ोही’ उघडली असून काल संध्याकाळी साडेतीनच्या दरम्यान तेरेखोल नदीत नाईकवाडा, तोर्से व फकीरवाडा, तोर्से येथे केलेल्या कारवाईत १४ होड्या व सुमारे ३०० क्युबिक मीटर रेती जप्त करण्यात आली. बंदर कप्तान, खाण खाते व पेडणे उपजिल्हाधिकार्‍यांनी संयुक्तपणे पेडणे व सागरी पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.

नागरिकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत बंदर कप्तान खात्याचे अधिकारी प्रेमलाल सिरमयकर, पेडण्याचे उपजिल्हाधिकारी हरीष आडकोणकर, खाण खात्याचे रामनाथ शेटगावकर यांनी संयुक्त बैठक घेऊन पोलिसांच्या मदतीने सापळा रचला. त्यानुसार त्यांनी दोन होड्या व बोट घेऊन नईबाग, पेडणे येथून पत्रादेवीच्या बाजूने तेरेखोल नदीत रेती काढणार्‍या सर्व होड्या ताब्यात घेतल्या. दुसर्‍या बाजूने उपजिल्हाधिकारी आडकोणकर यांनी पेडणे पोलिसांच्या मदतीने धाड घातली. यावेळी नाईकवाडा, तोर्से येथे ११ होड्या व सुमारे ३०० क्युबिक मीटर रेती जप्त करण्यात आली. तर फकीरवाडा, तोर्से येथे ३ होड्या जप्त करण्यात आल्या. जप्त केलेल्या सर्व होड्या बंदर कप्तान खात्याने आपल्या ताब्यात घेऊन त्या ठिकाणी पोलीस तैनात ठेवले आहेत. जप्त केलेली रेती खाण खात्याने सील करून पेडणे पोलिसांच्या ताब्यात ठेवली आहे.
गेल्या वर्षापासून बेकायदा रेती उपशाविरुद्ध तेरेखोल नदीत करण्यात आलेली ही दुसरी मोठी कारवाई आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात नईबाग ते पोरस्कडे या भागात २१ होड्या जप्त करण्यात आल्या होत्या.
उपजिल्हाधिकारी आडकोणकर म्हणाले, की सरकारने परिपत्रक काढून उगवे आणि तोर्से या भागात रेती काढण्यास बंदी घातली आहे. तसेच सध्या रेती काढण्यास राज्यात बंदी आहे. यामुळे ही कारवाई करण्यात आली. बेकायदा रेती उपसा करणार्‍यांची गय केली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.