तुतिकोरीनमध्ये पुन्हा पोलिसांचा गोळीबार ः मृतांची संख्या ११

0
230

वेदांता स्टरलाईट कंपनीच्या कारखान्याविरोधी आंदोलनावेळी मंगळवारी दहा निदर्शक पोलिसांच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडल्यानंतर काल बुधवारीही तेथील परिस्थिती नियंत्रणाखाली येऊ शकली नाही. या आंदोलनाचा वणवा चेन्नईसह अन्य ठिकाणीही पसरला असून काल तुतिकोरीनमध्ये पोलीस व निदर्शकांदरम्यानच्या चकमकींमुळे आणखी एक आंदोलक पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला. यामुळे आंदोलनातील बळींची संख्या ११ वर पोचली आहे. या घटनेच्या चौकशीसाठी राज्य सरकारने एका निवृत्त न्यायाधीशाच्या नेतृत्वाखाली चौकशी आयोगाची स्थापना केली आहे.

दरम्यान या प्रकरणाची राष्ट्रीय मानव आयोगाने स्वेच्छा दखल घेतली असून तामिळनाडूचे मुख्य सचिव व पोलीस महासंचालक यांना नोटीसा जारी करून दोन आठवड्यांच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
मंगळवारी पोलिसी गोळीबारात १० आंदोलक ठार झाल्याने संतप्त नागरिकांनी काल पुन्हा रस्त्यांवर येऊन पोलिसांवर दगडफेक केली. अण्णानगर येथे अशाच प्रसंगी पोलिसांनी गोळीबार केला त्यात एकजण ठार झाला व अन्य काही आंदोलक जखमी झाले. काल स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेनेही निदर्शने करून पोलिसी गोळीबाराचा निषेध केला.

दरम्यान मद्रास उच्च न्यायालयाने काल स्टरलाईट कॉपर प्रकल्पाच्या प्रस्तावित विकास योजनेला स्थगिती देणारा आदेश जारी केला. पोलीस खात्याने आपल्या कारवाईचे समर्थन केले. कालच्या दिवशी आंदोलक रस्ते मोकळे करण्याची विनंती करूनही ऐकत नव्हते व त्यांनी दगडफेक केल्याने कारवाई करणे भाग पडले, असे पोलिसांचे म्हणणे आहे.