तीन नव्या आमदारांमुळे सरकार भक्कम ः मुख्यमंत्री

0
254

>> नव्या आमदारांना मंत्रीपदाबाबत कोणताही निर्णय नाही ः जुलैत विधानसभा अधिवेशन

गोवा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे तीन उमेदवार निवडून आल्याने भाजप आघाडी सरकार आणखी भक्कम झाले आहे. सरकारचे संख्याबळ २३ वर पोहोचल्याने तीन वर्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण करणार आहे. केंद्र सरकारच्या मागील दोन वर्षांत राबविण्यात न आलेल्या विविध नवीन योजना राबविण्यावर भर दिला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजप कार्यालयात काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन जुलै महिन्यात घेण्यात येणार आहे. अधिवेशन ३१ जुलैपूर्वी घेण्याची गरज आहे. संबंधित सर्वांशी चर्चा करून या अधिवेशनाची तारीख निश्‍चित केली जाणार आहे, अशी माहिती डॉ. सावंत यांनी दिली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी कॉंग्रेस पक्षाचे आणखी दोन आमदार भाजपच्या संपर्कात असल्याच्या केलेल्या दाव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी भाजप आघाडी सरकार स्थिर आहे, अशी मोघम प्रतिक्रिया व्यक्त केली.
मगो पक्षाचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी सरकारला पाठिंबा द्यावा की नाही याबाबत निर्णय घेतला पाहिजे, असेही सावंत यांनी एका प्रश्‍नावर बोलताना सांगितले.

दक्षिणेत खाणींच्या प्रश्‍नाचाही
भाजपला फटका बसला
दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील भाजपचा पराभव केवळ मगो पक्षामुळे झालेला नाही. खाण व इतर काही मुद्यांचा भाजपच्या मतदानावर परिणाम झाला आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
केंद्रात पुन्हा एकदा भाजप आघाडी सरकार स्थापन झाल्याने राज्यातील विकास कामे व इतर कामांसाठी सहकार्य निश्‍चित मिळणार आहे, असेही डॉ. सावंत यांनी सांगितले.

पणजीतील चुकलेल्या गणिताचे
काही कळले नाही
पणजी मतदार संघात संघटनात्मक काम चांगले असताना विजय मिळविण्यात कमी पडलो. पणजीत पराभव पत्करावा लागल्याचे दुःख वाटत आहे. पणजीत आमचे गणित कुठे चुकले हेच आम्हाला कळलेले नाही. यापुढे पणजी मतदारसंघातील संघटनात्मक कार्यावर जोर दिला जाणार असून आगामी निवडणुकीत विरोधी कॉंग्रेस पक्षाने काबीज केलेला बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

उत्तरेत खाण प्रश्‍नाचा
परिणाम नाही
उत्तर गोव्यातील मतदानावर खाण विषयाचा परिणाम झाला नाही. परंतु, दक्षिण गोव्यात मतदानावर खाण विषयाचा परिणाम झाला आहे, अशी कबुली डॉ. सावंत यांनी दिली. नव्याने निवडून आलेल्या आमदारांना मंत्रिपद देण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. नव्याने निवडून आलेल्या आमदारांनी अजून शपथ घेतलेली नाही. पावसाळी अधिवेशनात नव्या सभापतीची निवड केली जाऊ शकते, असेही सावंत यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला भाजपचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

गृह आधार योजना चालू राहणार
सरकारची गृह आधार योजना बंद केली जाणार नाही. येत्या जून महिन्यापासून गरजू महिलांना या योजनेचे अर्ज देण्यास सुरुवात केली जाणार आहे. तसेच गृह आधार योजनेचे दोन महिन्यांचे प्रलंबित दोन महिन्याचे मानधन वितरित केले जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

आगामी दोन महिन्यात प्रशासन लोकाभिमुख बनविण्यावर भर दिला जाणार आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने प्रशासनात जास्त लक्ष घालू शकलो नाही. आचारसंहिता मागे घेण्यात आल्यानंतर सरकारी अधिकार्‍यांची बैठक घेऊन प्रशासकीय यंत्रणेचा कारभार सुरळीत बनविला जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

सरकार मगोचा पाठिंबा
पुन्हा घेणार नाही

>> मंत्री गोविंद गावडेंना विश्‍वास

राज्यातील भाजप आघाडी सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल हेच विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट होत आहे, अशी प्रतिक्रिया कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी पत्रकारांशी बोलताना काल व्यक्त केली. भाजप सरकार चालविण्यासाठी मगोपचा पाठिंबा पुन्हा घेणार नाही, असा विश्‍वास मंत्री गावडे यांनी व्यक्त केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी मगोपचे नेते तथा आमदार सुदिन ढवळीकर यांना राजकीय आव्हान दिलेले आहे. मडकई मतदारसंघात पक्षीय काम वाढविण्याचा निर्णय भाजपने घेतला पाहिजे, असेही गावडे यांनी एका प्रश्‍नावर बोलताना सांगितले.

शिरोडा मतदारसंघात भाजप आणि मगोप यांच्यात अटीतटीची लढत होईल असे वाटत नव्हते. शिरोडा मतदारसंघात भाजपचा अठरा दिवस प्रचार केला. भाजप आघाडी सरकार टिकले पाहिजे, मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे. आमदार सरकार पक्षात असला पाहिजे हेच मुद्दे घेऊन प्रचार केला होता. शिरोडकर यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचा प्रचारात लाभ झाला. तसेच भाजप आघाडी सरकारमधून सुदिन ढवळीकर यांना वगळण्यात आल्याचा फायदा झाला, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले.