तीन दिवस जोरदार पाऊस शक्य

0
130

>> योग्य वातावरण नसल्याने मॉन्सून लांबला

राज्यातील पावसाचे प्रमाण हळूहळू वाढत असून २० ते २३ जून या काळात जोरदार वार्‍यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मान्सूनच्या वाटचालीसाठी योग्य वातावरण नसल्याने मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले आहे. १५ जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होईल असे जाहीर करण्यात आले होते. तथापि, मान्सून पाऊस लांबणीवर पडल्याने पावसाळी पिकावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील जनता मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत.
राज्यातील विविध भागात थोड्या प्रमाणात पाऊस पडत आहे. वायू चक्रीवादळामुळे दोन दिवस चांगला पाऊस पडला होता. जून महिन्यात आत्तापर्यंत केवळ ८ इंच पावसाची नोंद झाली आहे. या काळात सरासरी २० इंच पाऊस पडायला हवा होता. राज्यात पावसाचे प्रमाण ६० टक्के कमी आहे, अशी माहिती हवामान विभागाकडून मिळाली आहे.

मागील चोवीस तासात मुरगाव येथे कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस नोंद झाले आहे. तर पणजी येथे किमान तापमान २४ अंश सेल्सिअस नोंद झाले आहे. आगामी तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. मागील चोवीस तासात म्हापसा, ओल्ड गोवा, साखळी, सांगे आणि केपे येथे एक इंच पावसाची नोंद झाली आहे. पेडणे, पणजी, काणकोण, दाबोली, मडगाव, मुरगाव येथेही पावसाची नोंद झाली आहे.