तीन तालुक्यांत रविवारी बत्ती गुल

0
47

>> पेडणे, बार्देशसह तिसवाडीच्या काही भागांत वीजपुरवठा राहणार बंद

सध्या अधूनमधून बरसणार्‍या अवकाळी पावसावेळीच राज्यात विजेचा लपंडाव पाहायला मिळत असून, पावसाळा कालावधीत वीजपुरवठ्यात मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेत वीज खाते सतर्क झाले आहे. उत्तर गोव्यातील पेडणे, बार्देश आणि तिसवाडी या तालुक्यांत रविवार दि. २२ मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मान्सूनपूर्व वीजसामुग्रीच्या दुरुस्ती व देखभालीच्या कामासाठी वीजपुरवठा बंद ठेवला जाणार आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वार्‍यांसह अवकाळी पाऊस बरसत असून, राज्याच्या विविध भागांत या पावसाने हजेरी लावली आहे. वादळी वार्‍यांमुळे झाडांचा स्पर्श वीजवाहिन्यांना होऊन वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे खंडित होणार्‍या वीजपुरवठ्याने नागरिक हैराण झाले आहेत. सध्या कधी नव्हे एवढा उकाडा प्रचंड वाढला असून, केवळ दिवसाच नव्हे, तर रात्रीही अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. अशा परिस्थितीत वीजपुरवठा बंद झाल्यास नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागते. ही स्थिती लक्षात घेता वीज खाते सतर्क झाले असून, पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत राहावा, यासाठी वीज खात्याकडून दक्षता घेतली आहे.

पावसाळा कालावधीत वीजपुरवठ्यात व्यत्यय येऊ नये म्हणून वीजवाहिन्या, ट्रान्सफॉर्मर व अन्य सामुग्रीच्या दुरुस्ती व देखभालीसाठी वीज खात्याने संपूर्ण बार्देश व पेडणे तालुका, तसेच तिसवाडी तालुक्याच्या काही भागात रविवारी वीजपुरवठा बंद ठेवला जाणार असल्याचे जाहीर केले आहे. रविवारी सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद ठेवला जाणार असल्याचे सुट्टीच्या दिवशी नागरिकांचे मोठे हाल होणार आहेत.

दरम्यान, गुरुवार दि. १९ मे रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पणजीतील धेंपो हाऊस ट्रान्सफॉर्मरवरील वीजपुरवठा बंद ठेवला जाणार असून, मच्छी मार्केट व सभोवतालच्या भागात वीजपुरवठा बंद राहील. तसेच दि. २० मे रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मिरामार अंडरग्राऊंड ट्रान्सफॉर्मर, स्पोर्टस् आथॉरिटी ट्रान्सर्फामर आणि दुकले हेवन ट्रान्सफॉर्मरवरील वीजपुरवठा बंद राहणार आहे. दि. २१ मे रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पणजीतील संचयनी ट्रान्सफॉर्मरवरील वीजपुरवठा बंद राहील.

विजेच्या धक्क्याने वीज कर्मचार्‍याचा मृत्यू

>> कणकिरे-गुळेली येथील दुर्दैवी घटना

कणकिरे-गुळेली येथे काल वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना विजेचा धक्का लागून वीज कर्मचारी संजय गावकर (वय ४०, रा. ठाणे सत्तरी) यांचा दुदैवी अंत झाला. अन्य एका वीज कर्मचार्‍याच्या हलगर्जीपणामुळे संजय गावकर यांना प्राण गमवावा लागला.

मंगळवारी रात्री पावसामुळे गुळेली भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे सकाळी तो सुरळीत करण्यासाठी वाळपई उपकेंद्रावरुन कणकिरे येथे अन्य वीज कर्मचार्‍यांसह संजय गावकर हे गेले होते. यावेळी वीजवाहिनीला अडथळा निर्माण करणारी झाडे संजय गावकर तोडू लागले; पण त्यावेळी सोबत आलेल्या वीज कर्मचार्‍यांनी वीजप्रवाह बंद केला नाही. त्यामुळे संजय गावकर यांना विजेचा धक्का बसला. त्यांना लगेचच वाळपई आरोग्य केंद्रात नेण्यात आले; पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

जोपर्यंत गावकर कुटुंबाला नुकसानभरपाई आणि संजय गावकर यांच्या पत्नीला नोकरीची हमी दिली जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. त्यामुळे वाळपई आरोग्य केंद्रात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर डिचोली येथील कार्यकारी अभियंता वल्लभ सामंत व सहाय्यक अभियंता दीपक गावस यांनी वरिष्ठांशी चर्चा करून कुटुंबाला लेखी आश्‍वासन दिल्यानंतर मृतदेह गोमेकॉत शवचिकित्सेसाठी पाठविण्यात आला.

संजय गावकर हे आठ वर्षांपूर्वी वीज खात्यात नोकरीला लागले होते. चार वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी व तीन वर्षांची मुलगी असा परिवार आहे. त्याच्या निधनाने गावकर कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.

खातेनिहाय चौकशीचा आदेश

कणकिरे-सत्तरी येथे वीज खात्याचे लाइनमन हेल्पर संजय गावकर यांचा विजेचा धक्का लागून झालेल्या मृत्यू प्रकरणी खातेनिहाय चौकशीचा आदेश वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल दिला. दरम्यान, पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी वीज कर्मचारी संजय गावकर यांचा सेवा बजावताना झालेल्या मृत्यू प्रकरणी दुःख व्यक्त केले आहे. वीजमंत्र्यांच्या सहकार्यातून गावकर कुटुंबीयांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे, असेही डॉ. राणे यांनी म्हटले आहे.