तिहेरी तलाकवर बंदी

0
216

>> सुप्रिम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

तोंडी तिहेरी तलाकविरोधात (ट्रिपल तलाक) संसदेत कायदा बनवावा, असे आदेश केंद्र सरकारला देतानाच तोंडी तलाकवर सहा महिने बंदी घालण्याचा ऐतिहासिक निकाल काल सर्वोच्च न्यायालयाने दिला. सरन्यायाधीश जे. एस. खेहेर यांनी हा निकाल वाचून दाखविला. एक हजार वर्षांपूर्वीची ही प्रथा सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने ३ विरुद्ध २ अशा बहुमताने रद्द केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ३९५ पानी निर्णयात म्हटले आहे, की तीन तलाक घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे. घटनापीठातील दोन न्यायाधीशांनी तीन तलाकवर सहा महिन्यांची बंदी घातली. न्यायालयाने म्हटले आहे की तलाक कुराणाच्या मुळ सिद्धांताचा भाग नसून सरकारने यावर कायदा केला पाहिजे.
सरन्यायाधीश जे. एस. खेहर आणि न्या. अब्दुल नजीर हे तीन तलाक घटनाबाह्य असल्याच्या विरुद्ध होते. तर, न्या. आर. एफ. निरमन, यू. यू. ललित आणि कुरियन यांनी तीन तलाक घटनाबाह्य असल्याचे म्हटले. सरन्यायाधीशांनी म्हटले आहे, की यासंबंधी सरकारने ६ महिन्यांत कायदा करावा. त्यामुळे चेंडू मोदी सरकारच्या कोर्टात असून पुढील सहा महिने मुस्लिम स्त्री-पुरुष एकाचवेळी तीन तलाक म्हणून वेगळे होऊ शकणार नाहीत.