Home Featured तिसऱ्या जिल्ह्याच्या मुख्यालयाची जागा अद्याप निश्चित नाही, मात्र वाद सुरू

तिसऱ्या जिल्ह्याच्या मुख्यालयाची जागा अद्याप निश्चित नाही, मात्र वाद सुरू

0

राज्य मंत्रिमंडळाने सांगे, केपे, धारबांदोडा, काणकोण या तालुक्याचा समावेश करून तिसरा जिल्हा स्थापना करण्यास मंजुरी दिल्यानंतर आता, तिसऱ्या जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या जागेवरून वाद सुरू झाला आहे. दरम्यान, तिसऱ्या जिल्ह्याच्या मुख्यालयाची जागा अजूनपर्यंत निश्चित करण्यात आलेली नाही, असे स्पष्टीकरण राज्य सरकारच्या नियोजन, सांख्यिकी खात्याचे संचालक विजय बी. सक्सेना यांनी काल
केले.

राज्यात उत्तर आणि दक्षिण असे दोन जिल्हे कार्यरत आहेत. राज्यात गेल्या कित्येक वर्षापासून फोंडा हे मध्यवर्ती ठिकाणी निश्चित करून तिसरा जिल्हा स्थापन करण्याची मागणी केली जात होता. राज्य सरकारने तिसऱ्या जिल्ह्याच्या स्थापनेचा अभ्यास करण्यासाठी एका समितीची स्थापना केली होती. या समितीने काणकोण, केपे, सांगे आणि धारबांदोडा या चार तालुक्याचा समावेश करून तिसरा जिल्हा स्थापन करण्याची शिफारस केली आहे. राज्य मंत्रिमंडळाने तिसऱ्या जिल्ह्याच्या निर्मितीला मान्यता दिली आहे. केपे- कुडचडे या ठिकाणी मुख्यालय स्थापन करण्यावर विचार केला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

मुख्यालयावरून वाद

सांगे, केपे, कुडचडे आदी भागात तिसऱ्या जिल्ह्याचे स्वागत केले जात आहे. मात्र तिसऱ्या जिल्ह्यांचे मुख्यालय कुडचडे येथे स्थापन केले जाणार असल्याचे वृत्त समाजमाध्यमावर प्रसिद्ध झाल्याने खळबळ उडाली आहे. माजी उपमुख्यमंत्री, केप्याचे माजी आमदार चंद्रकांत कवळेकर यांनी समर्थकांसमवेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय केपे येथे करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, तिसऱ्या जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या जागेचा विषय राज्य विधानसभेत उपस्थित करणार असून केपे येथे मुख्यालय स्थापन करण्याची मागणी करणार आहे, असे केप्याचे आमदार आल्टन डिकॉस्टा यांनी म्हटले आहे.