तिसऱ्या जिल्ह्यासंबंधीचा निर्णय हा अजून प्राथमिक टप्प्यात असून, त्याचे मुख्यालय कोठे असावे याबाबत अजून काहीही ठरले नसल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी स्पष्ट केल.
काल शून्य तासाला काही विरोधी आमदार व सत्ताधारी आमदार यांच्यात या मुद्द्यावरून शाब्दिक चकमक झाल्यानंतर त्यासंबंधीचे स्पष्टीकरण करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे म्हणाले की, तिसऱ्या जिल्ह्याच्या स्थापनेसंबंधीचा प्रस्ताव हा अगोदर केंद्र सरकारकडे पाठवावा लागणार आहे. तद्नंतर या तिसऱ्या जिल्ह्याच्या स्थापनेसाठीची प्रक्रिया सुरू होणार असून, जिल्ह्याचे नाव काय असावे व त्याचे मुख्यालय कोठे असावे या सगळ्या बाबींवर नंतरच निर्णय होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रस्तावित तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय कोठे असावे या प्रश्नावरून काल विरोधी पक्षाचे आमदार क्रूझ सिल्वा व एल्टन डिकॉस्टा यांची भाजप आमदार नीलेश काब्राल यांच्याशी विधानसभेत शाब्दिक चकमक झाली.
क्रूझ सिल्वा यांनी काल शून्य तासाला विधानसभेत हा प्रश्न मांडताना तिसऱ्या जिल्ह्याची स्थापना झाल्यानंतर या जिल्ह्याचे मुख्यालय कोठे असावे हा वादाचा मुद्दा बनला असल्याचे स्पष्ट केले. हे मुख्यालय कुडचडे येथे उभारण्याचा घाट घातला जात असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी बोलताना केपे मतदारसंघाचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी हे मुख्यालय केपे तालुक्यातच असायला हवे, अशी मागणी केली. नीलेश काब्राल हे तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय कुडचडे येथे करू पाहत असल्याचा आरोप डिकॉस्टा यांनी केला. त्यावरून नीलश काब्राल यांच्यासोबत एल्टन डिकॉस्टा व कू्रझ सिल्हा यांच्याशी शाब्दिक चकमक झाली.