तिसरी सर्वोत्तम कामगिरी

0
80

>> भारताची ६६ पदकांसह सांगता

ऑस्ट्रेलियामधील गोल्ड कोस्ट येथे काल रविवारी संपलेल्या २१व्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंनी धडाकेबाज कामगिरी करत ६६ पदकांची कमाई केली. त्यामध्ये २६ सुवर्ण, २० रौप्य आणि २० कांस्य पदकांचा समावेश आहे. या स्पर्धेत भारत पदकतालिकेत तिसर्‍या क्रमांकावर राहिला. ऑस्ट्रेलिया ८० सुवर्ण, ५९ रौप्य व ५९ कांस्यपदकांसह पहिल्या तर इंग्लंड ४५ सुवर्ण, ४५ रौप्य व ४६ कांस्यपदकांसह दुसर्‍या क्रमांकावर राहिला. आतापर्यंतच्या स्पर्दा इतिहासातील सर्वश्रेष्ठ कामगिरीमध्ये ही भारताची तिसरी अव्वल कामगिरी आहे.

यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टर पी. गुरुराजा याने पहिल्या दिवशी ५६ किलोवजनी गटात रौप्यपदक जिंकून भारताच्या झोळीत पहिले पदक टाकले. तर काल रविवारी बॅडमिंटनमध्ये पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी यांनी रौप्य पदकासह भारताच्या मोहिमेची सांगता केली. २०१४ मध्ये ग्लास्गो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने ६४ पदकांची कमाई केली होती. त्याच्या तुलनेत यावेळच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील भारताची कामगिरी अव्वल ठरली आहे. भारताने २०१०मध्ये दिल्लीमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये १०१ पदकांची कमाई केली होती. तसेच २००२मध्ये मँचेस्टर येथील स्पर्धेमध्ये ६९ पदके मिळवली होती.