तिसरी लाट येतेय

0
52

एकीकडे देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे. काल सोमवारी गेल्या १६० दिवसांतील सर्वांत कमी रुग्ण देशात आढळले. रविवारच्या तुलनेत कालचे प्रमाण १९ टक्क्यांनी कमी होते. परंतु तरीही येत्या ऑक्टोबरपर्यंत देशात कोरोनाची तिसरी लाट धडकेल असा इशारा देण्यात येत आहे. हा इशारा दुसर्‍या तिसर्‍या कोणी नव्हे, तर केंद्र सरकारने नेमलेल्या तज्ज्ञ समितीनेच दिला आहे. ह्या इशार्‍याचे कारण आहे सध्याचा कोरोनाचा ‘आर व्हॅल्यू’ किंवा ‘रिप्रॉडक्शन रेट’. कोणत्याही विषाणूच्या संसर्गाच्या गतीचे हे मोजमाप आहे. एक व्यक्ती किती लोकांना संसर्ग देऊ शकेल त्याचे अनुमान त्यावरून करता येते. देशातील काही राज्यांत जरी सध्या कोरोनाचे प्रमाण घटले असले तरी केरळसारख्या राज्यांमध्ये विषाणू संसर्गाचे हे प्रमाण वाढतेच आहे. त्यामुळेच येत्या ऑक्टोबरपर्यंत तिसरी लाट धडकेल असा इशारा देत तज्ज्ञांनी सरकारला सावध केलेले आहे.
येणार्‍या तिसर्‍या लाटेचा धोका मुलांना अधिक संभवतो हे सरकारने यापूर्वीच सूचित केलेले आहे. याचे मुख्य कारण मुलांचे लसीकरण अद्याप झालेले नाही. परंतु याचा अर्थ तिसर्‍या लाटेत केवळ मुलेच बाधीत होतील असे बिल्कूल नाही. परंतु लसीकरण न झालेल्या मुलांचे आपल्या देशातील प्रमाण मोठे असल्याने त्यांना होऊ शकणार्‍या संभाव्य संसर्गाची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक पूर्वतयारी करण्यास केंद्राने सर्व राज्यांना सांगितले आहे. देशातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत बालरोगतज्ज्ञांची ८३ टक्के तर सामाजिक आरोग्य केंद्रांत ६३ टक्के कमी असल्याची सरकारचीच आकडेवारी आहे. या परिस्थितीत मुलांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा सुसज्ज करणे आव्हानात्मक राहणार आहे. त्यामुळेच सरकारने त्यासंदर्भात युद्धपातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे.
गोव्यामध्येही तिसर्‍या लाटेची संभाव्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने काही घोषणा केल्या होत्या. त्यातील किती प्रत्यक्षात आल्या व किती आणि कोणती सज्जता ठेवली गेली आहे त्याचा तपशील सरकारने जनतेला द्यावा. सरकारने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीच्या बैठका नियमितपणे होतात का, त्यात ह्या तयारीच्या प्रगतीचा आढावा घेतला जातो का ह्यासंबंधीही माहिती जनतेसमोर ठेवली गेली पाहिजे. राज्य सरकार दुसर्‍या लाटेत झाले त्याप्रमाणे आग लागल्यावर विहीर खोदायला धावणार नाही अशी आशा आहे.
मुलांसाठी रुग्णवाहिका, डॉक्टर, व्हेंटिलेटर आदींची सज्जता करण्याबरोबरच कोविड वॉर्डांत मुलांना भरती करावे लागले तर त्यांच्या सोबत राहण्यासाठी पालकांची व्यवस्था करण्यापर्यंत असंख्य सूचना केंद्र सरकारच्या तज्ज्ञ समितीने केलेल्या आहेत. गोव्यात त्याची कोठवर अंमलबजावणी झाली आहे हे सरकारने सांगायला हवे.
लसीकरणाच्या बाबतीत भारत अजूनही जगापेक्षा खूप मागे आहे. केवळ नऊ टक्के लोकसंख्येचे संपूर्ण लसीकरण झाले आहे. अमेरिकेत हे प्रमाण ५२ टक्के आहे. मुलांच्या लसीकरणासंदर्भात सध्या केवळ झायडस कॅडिलाची लस वगळता मुलांसाठी अन्य लसी उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे अशा परिस्थितीत तिसरी लाट धडकली तर काय हाहाकार उडेल कल्पनाही करवत नाही.
सध्या कोरोनाच्या वुहानमधून आलेल्या मूळ विषाणूपेक्षा डेल्टा विषाणूच जगभरात धुमाकूळ घातल असल्याचे दिसते. वुहान विषाणूच्या संसर्गापेक्षा डेल्टाच्या संसर्गाचे प्रमाण दुप्पट आहे. तिसर्‍या लाटेमध्ये हा विषाणू आणखी कोणते नवे रूप घेऊन येईल हे सांगता येत नाही. त्यात मुलांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला तर तो इतर मुलांत फैलावण्याचे प्रमाण फार मोठे असेल, कारण मास्क, सामाजिक अंतर, सॅनिटायझर वगैरेंबाबत मुले अनभिज्ञ असतात. त्यामुळे तिसर्‍या लाटेचे हे आव्हान किती मोठे असेल त्याचा अंदाज सरकारने बांधला पाहिजे आणि त्या दृष्टीने सज्जता केली पाहिजे. सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. परंतु तुमची निवडणूक गेली चुलीत, येथे लाखो मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे राज्य सरकारने केंद्राच्या तज्ज्ञ समितीचा इशारा गांभीर्याने घेऊन युद्धपातळीवर कोणकोणते प्रयत्न केले आहेत आणि येणार्‍या काळात केले जातील त्याचा तपशील द्यावा आणि जनतेला आश्वस्त करावे. तिसरी लाट आली तर इस्पितळे अपुरी पडतील असा इशारा केंद्रानेच दिलेला आहे. त्यासाठी ‘होलिस्टिक होम केअर मॉडेल’ म्हणजे घरच्याघरी उपचार व्यवस्था निर्माण करा असे तज्ज्ञांनी सुचवले आहे. गोवा हे छोटे राज्य आहे. येथे अशा प्रकारची व्यवस्था उभारता येणे शक्य आहे. सरकारने विनाविलंब कामाला लागावे.