मोफत पाणी योजनेचा दीड लाख ग्राहकांना लाभ

0
71

>> पाणीपुरवठा मंत्री दीपक पाऊसकर यांची माहिती; मुबलक पुरवठ्यासाठी अतिरिक्त केवळ ७० एमएलडी पाण्याची गरज

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वातंत्र्यदिनी जाहीर केलेल्या मोफत पाणी योजनेचा राज्यातील ३.१४ लाख ग्राहकांपैकी १.५० लाख ग्राहकांना लाभ मिळणार असल्याची माहिती काल पाणीपुरवठा खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर यांनी दिली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेल्या घोषणेनुसार येत्या १ सप्टेंबरपासून राज्यातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे मासिक १६ हजार लीटर एवढे पाणी मोफत पुरवण्याच्या योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. १६ हजार लीटरपर्यंत पाणी वापरणार्‍या दीड लाख ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे पाऊसकर यांनी स्पष्ट केले. मोफत पाण्याची सुविधा प्राप्त होणार असलेल्या ग्राहकांची टक्केवारी ४७.७७ टक्के एवढी असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

राज्यात पाण्याचा कोणताही तुटवडा नसून, मुबलक पाणी उपलब्ध आहे. आजच्या घडीला राज्याला प्रक्रिया केलेल्या ६०० एमएलडी एवढ्या पाण्याची गरज आहे. आणि सध्या राज्यात ५३० एमएलडी एवढी प्रक्रिया केलेले पाणी उपलब्ध आहे. प्रक्रिया केलेले आणखी ७० एमएलडी एवढे पाणी हवे आहे. आणि ही गरज पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर काम चालू असल्याची माहिती पाऊसकर यांनी दिली. प्रक्रिया केलेले जे अतिरिक्त ७० एमएलडी पाणी हवे आहे, ते येत्या ७ ते ८ महिन्यांत पुरवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

६ हजार लीटरपेक्षा जास्त पाणी
वापरल्यास पैसे आकारणार : पाऊसकर

१६ हजार लीटरपेक्षा जास्त पाणी वापरणार्‍या ग्राहकांना १६ हजार लीटरपर्यंतचे पाणी मोफत मिळेल, तर त्यावरील पाण्यासाठीचे पैसे त्यांना भरावे लागतील, असे मंत्री दीपक पाऊसकर यांनी स्पष्ट केले. ज्या ग्राहकांची बिलांची मोठी थकबाकी आहे, त्यांच्यासाठी एकरकमी परतफेड योजना सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.