भारतीय संस्कृतीची महती

0
93

योगसाधना – ५१६
अंतरंग योग – १०१

  • डॉ. सीताकांत घाणेकर

भारतीय संस्कृतीतील अशा गोष्टी अत्यंत विलोभनीय आहेत. आपल्या ऋषीमहर्षींनी तपस्या करून त्या लिहून ठेवल्या. वेळोवेळी अनेक संतमहापुरुषांनी त्यावर चिंतन करून त्यांचा गर्भितार्थ समाजापुढे अगदी सोप्या भाषेत मांडला. आपण या सर्वांचे ऋण फेडू शकणार नाही.

विश्‍वात अनेक राष्ट्रे आहेत. प्रत्येक राष्ट्राचा वेगळेपणा आहे – वंश, वर्ण, भाषा, संस्कृती, जीवनपद्धती… या सगळ्यात उठून दिसतो तो आपला भारत!

भारताच्या अनेक गोष्टी जगावेगळ्या आहेत. भारतीय संस्कृती विविधतेने ओतप्रोत आहे. प्रत्येक क्षेत्रात भारताचे योगदान अप्रतिम आहे – तत्त्वज्ञान, अध्यात्म, विज्ञान, वाङ्‌मय, संगीत, कला, स्थापत्यशास्त्र, लोककला, पर्यावरण, वैद्यकीय (आयुर्वेद), योगशास्त्र, खगोलशास्त्र, राजनीती इत्यादी.

आपल्या संस्कृतीची अनेक वैशिष्ट्ये आहेत-
या देशात एक विशिष्ट, विलोभनीय पवित्रता आहे. आपल्या पूर्वजांनी पंचमहाभूतांमध्ये – धरती, जल, वायू, अग्नी, आकाश तसेच वृक्षवनस्पतींमध्ये देवत्व बघितले. त्याचप्रमाणे काही छोट्यामोठ्या पशू-प्राणी-पक्षी… यांचा संबंध ईश्‍वराशी जोडला- नाग, मूषक, गाय, कुत्रा, वाघ, सिंह, हत्ती… त्यांना मान दिला. काहींची पूजादेखील केली. नद्यांना देवत्व प्रदान केले. कदाचित याच वैशिष्ट्यांमुळे स्वतः विष्णूंनी विविध अवतार इथे घेतले.

  • या राष्ट्रावर अनेक परकीयांची भयानक आक्रमणे झाली. त्यांनी भयंकर रक्तपात केला. अमानुषीय अत्याचार केले. एक एक येतच राहिले… मुघल, पठाण, पोर्तुगीज, फ्रेंच, डच, ब्रिटिश… प्रत्येकाने आपापल्या परीने भारतीय संस्कृती संपवून आपली संस्कृती प्रस्थापित करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. थोडाफार वाईट परिणाम झाला. तरीही आपली संस्कृती उभी आहे. ती पुनरुत्थान करण्याचा प्रयत्न करीत आहे.

जगातील एकावेळी उत्कृष्ट मानल्या गेलेल्या – ग्रीक, रोम… या संस्कृती रसातळाला गेल्या. पण भारतीय संस्कृतीचे योगदान वाढतंच आहे. ते वाढतंच राहणार कारण आपल्या पूर्वजांची तेवढी पुण्याई आहे.
चौफेर नजर फिरवली तर ही गोष्ट सहज लक्षात येते. मग तो योग असू दे अथवा आयुर्वेद असू दे किंवा भारतीय कला- संगीत, नृत्य.. असू दे. अनेक क्षेत्रात अनेक राष्ट्रे भारताकडे विश्‍वगुरु म्हणून आशेने बघत आहेत.
आपण भगवान विष्णूबद्दल विचार करीत होतो. लक्ष्मीबरोबर तो सागरात शयन करतो हे आपण बघितले. म्हणजे आपला देव पाण्यात राहतो. पू. पांडुरंगशास्त्री आठवले पाण्याबद्दल छान विवेचन करतात… ते म्हणतात की – श्रीकृष्ण गीतेत सांगतात की पाणी माझेच स्वरूप आहे.
‘जीवनं सर्व भूतेषू ’- पाण्याच्या गुणांवर भगवान प्रसन्न आहेत. त्याची कारणे अनेक आहेत…
१. पाणी दुसर्‍याची मलिनता दूर करून त्याला स्वच्छ बनवते.
२. पाणी उत्साहप्रेरक व स्फूर्तिदायक आहे.
३. पाण्याची पातळी समानच राहते. पाण्यात कधी खंड पडत नाही. निसर्गतः पाणी जितक्या उंचावरून येते तितकेच वर जाते.
४. शीतलता हा पाण्याचा स्वाभाविक गुण आहे – पाण्याच्या या गुणावर प्रसन्न होऊन भगवान पाण्यात राहू लागले.
ते म्हणतात की माणसानेही स्वतःच्या जीवनात भगवंताला आणायचे असेल तर पाण्यासारखे जीवन बनवले पाहिजे.
खरेच आज आमच्यातील प्रत्येकाने आपले जीवन असे बनवायला हवे तरच आपला जीवनविकास होईल. विश्‍वाची विनाशाकडे घोडदौड चालू आहे ती थोडी कमी होईल.

शास्त्रीजी काय म्हणतात ते बघूया…
१. माणसाचा स्वभाव शीतल असला पाहिजे.
२. दुसर्‍याचे जीवन निर्मळ व स्वच्छ बनविण्याचा माणसाने प्रयत्न केला पाहिजे.
३. आपले जीवनही दुसर्‍याकरिता उत्साहप्रेरक बनले पाहिजे.
४. आपले प्रभूवरील प्रेम कोणत्याही स्थितीत समान राहिले पाहिजे. आपल्या प्रभूप्रेमात खंड पडता कामा नये.
५. पाणी जेवढ्या उंचावरून येते तितकेच ते वर जाते. शिवातून अलग झालेल्या जिवानेही शिवात जाण्याची तशीच वृत्ती राखली पाहिजे.
६. ईश्‍वर निराकार आहे. पाणीही निराकार आहे. जशा पात्रात ठेवाल तसा आकार पाणी धारण करतो. भगवंतदेखील निराकार म्हणजे जी इच्छा करतो तो आकार घेईल असा आहे.
७. ‘नारा’ शब्दाचा अर्थ जनसमुदाय असाही होतो. त्या दृष्टीने ‘नारायण’ म्हणजे जनसमुदायात राहणारा. लोकात राहूनच लोकांपासून लपून राहणार्‍या भगवंताला ओळखणे कठीण आहे. या संदर्भात उत्कृष्ट उदाहरण म्हणजे श्रीकृष्ण. अर्जुनाच्या सखारूपाने एवढा जवळ राहिला. दोघांची आत्मीयता एवढी झाली तरीदेखील अर्जुन भगवंताला ओळखू शकला नाही. म्हणून सुरुवातीला आत्मिक तत्त्वज्ञान, मोह, माया… अशा विविध विषयांवर तो श्रीकृष्णाला छोट्यामोठ्या शंका विचारतो.

अकराव्या अध्यायात (विश्‍वरूपदर्शन योग) अर्जुन भगवंताकडे त्यांचे ईश्‍वरीस्वरूप बघण्याची इच्छा प्रकट करतो. तेव्हा ते रूप चर्मचक्षूंनी दिसणे अशक्य असल्यामुळे अर्जुनाला त्यांनी दिव्य दृष्टी दिली. त्या विश्‍वरूपाचे वर्णन अर्जुनाने भगवंताजवळ केले. तसेच संजयाने धृतराष्ट्रास सांगितले.
एवढ्या जवळ असलेल्या अर्जुनाला जर देवत्व दिसले नाही तर आपल्यासारख्या सामान्याला देव कसा दिसणार? श्रीकृष्ण अवतार आहेत हे फक्त भीष्म पितामह, विदुर व कुंतीमाता यांनाच माहीत होते, असे इतिहासकार लिहितात.

दुर्योधन, दुःशासन, शकुनी, धृतराष्ट्र ही चांडाळ चौकडी तर श्रीकृष्णाला समजूच शकली नाही. दुर्योधन तर त्याला गुराखी, मायावी … असेच समजत होता.

आमच्यासारख्यांना आध्यात्मिक ज्ञान अत्यल्प असते. म्हणून हा भवसागर – संसारसागर जिथे एवढे कष्ट आहेत, तो कसा पार करायचा याविषयी भीती किंवा शंका वाटते. इथे पू. शास्त्रीजी श्रीमद्आद्य शंकराचार्य यांच्या पांडुरंगाष्टकम् मधील एका छान श्‍लोकाची आठवण करून देतात-
प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां
नितंबः कराभ्यां धृतो येन तस्मात् |
विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः
परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम् ॥

  • मला अनन्य प्रेमाने शरण येणार्‍या भक्तांना भवसागर हा फक्त कमरेइतकाच खोल आहे. तो सहज पार करता येतो. हे सांगण्याकरता ज्याने कमरेवर हात ठेवलेले आहेत, माझ्या भक्तांसाठी, ब्रह्मदेवाचा सत्यलोक हा कमरेपासून नाभिस्थान जितके उंच आहे त्यापेक्षा अधिक दूर नाही- हे दाखवण्यासाठी ज्याने आपली बोटे नाभिस्थानाकडे वळवली आहेत अशा परब्रह्मरूपी पांडुरंगाला मी नमस्कार करतो.

हे सर्व ज्ञान घेतले की लक्षात येते की भगवंत भक्ताची, मनुष्यमात्राची किती काळजी घेतात ते साहजिकच आहे. कारण आपण सर्व मानवजात त्याची प्रिय मुले आहोत. म्हणूनच म्हणतात ना – * त्वमेव माता पिता त्वमेव.
अशा या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला की सहज वाटते की आणखी खोलात जाऊन ज्ञान मिळवावे. हे ज्ञान अगाध, गूढ आहे. कदाचित अनेक जन्म लागतील अभ्यास करायला पण एक गोष्ट नक्की आहे की एकदा गोडी लागली की व्यसन लागते आणि त्यामुळे व्यक्ती ज्ञान मिळवीतच जाते. मुख्य म्हणजे हे असले व्यसन चांगले असते. कारण त्यामुळे विश्‍व व विश्‍वकर्त्याची माहिती उपलब्ध होते. मनःशांती मिळते. समस्यांना सामोरे जाण्याची शक्ती मिळते. आत्मशक्ती वाढते. जीवनविकासाकडे वाटचाल सुरू होते.

भगवान विष्णूचा विचार करताना आणखी एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे विष्णूच्या नाभिकमळातून ब्रह्मदेव प्रकटला असे पुराणात सांगितले आहे. पांडुरंगशास्त्री म्हणतात –
‘ब्रह्मा हा सर्जनाचा देव आहे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. ती सृष्टी निर्माण करण्यासाठी हवी असलेली पुष्टी जशी गर्भस्थ बालक आईपासून प्राप्त करतो तशी ब्रह्माने विष्णूपासून मिळवली. गर्भात असलेले बालक स्वतःच्या उदरनिर्वाहार्थ स्वतःच्या आईशी नाभिस्थानाने जोडलेले असते- ही गोष्ट आपल्याला माहितीच आहे.

भारतीय संस्कृतीतील अशा या गोष्टी अत्यंत विलोभनीय आहेत. आपल्या ऋषीमहर्षींनी तपस्या करून त्या लिहून ठेवल्या. वेळोवेळी अनेक संतमहापुरुषांनी त्यावर चिंतन करून त्यांचा गर्भितार्थ समाजापुढे अगदी सोप्या भाषेत मांडला. आपण या सर्वांचे ऋण फेडू शकणार नाही. पण या सर्व ज्ञानाचा आपण आपल्या योगसाधनेत वापर करूया व शांतसुखमय जीवन जगू या.
(संदर्भ ः ‘संस्कृती पूजन’ – पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या प्रवचनांवर आधारित)