>> आंदोलक शेतकर्यांना घरी परतण्याचे आवाहन
>> कॉंग्रेसतर्फे आज ‘किसान विजय दिवस’
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करताना कृषीविषयक तीनही कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. या प्रश्नावर आंदोलन करणार्या शेतकर्यांना त्यांनी घरी परतण्याचे आवाहन केले. हे तीन कायदे मागे घेण्यासाठी काही शेतकरी संघटनांनी बराच काळ आंदोलन केले होते. काल गुरुनानक देवजींच्या प्रकाशाचा पवित्र सण आहे. या पवित्र दिवशी आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी आंदोलक शेतकर्यांना घरी परतण्याचे आवाहन करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
प्रयत्न करूनही आम्ही काही शेतकर्यांना शेतकर्यांच्या हिताचे स्पष्टीकरण देऊ शकलो नाही. शेतकर्यांचाच एक वर्ग त्याला विरोध करत होता, पण आमच्यासाठी तो महत्त्वाचा होता. या शेतकर्यांनाही सर्वांनी समजावण्याचा प्रयत्न केला. अनेक माध्यमांतून चर्चा सुरू राहिली. शेतकर्यांचा युक्तिवाद समजून घेण्यात आम्ही कोणतीही कसर सोडली नाही, असे पंतप्रधान म्हणाले.
आमचे सरकार शेतकर्यांच्या कल्याणासाठी, विशेषत: लहान शेतकर्यांच्या कल्याणासाठी देशाच्या कृषी जगताच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी, खेड्यातील गरिबांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, पूर्ण प्रामाणिकपणे, समर्पणाने शेतकर्यांची स्थिती सुधारण्यासाठी तीन कृषी कायदे आणले. त्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य किंमत मिळावी यासाठी आम्ही हे केले. वर्षानुवर्षे ही मागणी होत होती. यापूर्वीही अनेक सरकारांनी यावर विचारमंथन केले होते. यावेळीही चर्चा व विचारमंथन झाले. देशाच्या कानाकोपर्यातील अनेक शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिला, असे पंतप्रधानांनी म्हटले.
मी आंदोलक शेतकर्यांना घरी परतण्याचे आवाहन करतो. महिनाअखेरीस सुरू होणार्या संसदेच्या अधिवेशनादरम्यान तो संसदेद्वारे मागे घेतला जाईल, असे पंतप्रधान म्हणाले.
आज सरकारने कृषी क्षेत्राशी संबंधित आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. झिरो बजेट शेती अर्थात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी, देशाच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन शास्त्रोक्त पद्धतीने पीक पद्धतीत बदल करणे. एमएसपी अधिक प्रभावी आणि पारदर्शक करण्यासाठी, भविष्याचा विचार करून अशा सर्व विषयांवर निर्णय घेण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल. या समितीमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ, कृषी अर्थतज्ज्ञ यांचे प्रतिनिधी असतील, असे पंतप्रधानांनी म्हटले.
कॅप्टन अमरिंदर सिंग
यांच्याकडून समाधान
केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केल्यानंतर या निर्णयावर पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी यावर समाधान व्यक्त केले आहे. यावेळी अमरिंदर सिंग यांनी ट्विट करताना, प्रत्येक पंजाबीच्या मागण्या मान्य केल्याबद्दल आणि कृषीविषयक तीन कायदे रद्द केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. केंद्र सरकार शेतीच्या विकासासाठी एकत्र काम करत राहील, याची मला खात्री आहे, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.
हे तर पंतप्रधान मोदींचे
राजकीय कशल्य ः शहा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या घोषणेचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी या घोषणेसाठी ‘गुरु पूरब’च्या विशेष दिन निवडला. प्रत्येक भारतीयाच्या कल्याणाशिवाय आणखी कोणतेही विचार ते करत नाहीत, हेच यातून दिसून येत असून मोदी यांनी उत्कृष्ट राजकीय कौशल्य दाखवले असल्याचे ट्विट अमित शहा यांनी केले आहे.
दुसरीकडे आंदोलन तत्काळ मागे घेतले जाणार नाही. आम्ही त्या दिवसाची वाट पाहू जेव्हा कृषी कायदे संसदेत रद्द केले जातील. सरकारने किमान हमीभावासोबत शेतकर्यांच्या इतर मुद्द्यांवरही चर्चा करावी असे म्हणत शेतकरी आंदोलन तात्काळ स्थगित करण्यास भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी नकार दिला आहे.
न्याय आणि अहिंसेचा
विजय ः सोनिया गांधी
कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हा शेतकर्यांच्या बलिदानाचा विजय असल्याचे म्हटले आहे. सोनिया म्हणाल्या की, ७०० हून अधिक शेतकरी कुटुंबातील सदस्यांनी न्यायाच्या या लढ्यात बलिदान दिले आहे. आज त्यांचे बलिदान सार्थकी लागले आहे. आज सत्य, न्याय आणि अहिंसेचा विजय झाला असल्याचे सांगून त्यांनी आनंद व्यक्त केला.
आज कॉंग्रेसतर्फे किसान
विजय दिवस साजरा करणार
कॉंग्रेस उद्या म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी देशभरात ‘किसान विजय दिवस’ साजरा करणार आहे. हे पाहता, सरकारच्या निर्णयाविरुद्ध शेतकर्यांच्या चिकाटी आणि उत्साही लढ्याला सलाम करण्यासाठी राज्य घटकांना किसान विजय रॅली किंवा किसान विजय सभा आयोजित करण्यास सांगितले आहे.
हा शेतकर्यांचा ऐतिहासिक
विजय ः योगेंद्र यादव
शेतकरी नेते आणि स्वराज इंडियाचे संयोजक योगेंद्र यादव यांनी प्रतिक्रिया देताना हा शेतकर्यांचा ऐतिहासिक विजय असल्याचे म्हटले आहे.