मुख्यमंत्र्यांनी खरेदी केलेल्या खाण जमिनीची चौकशी करा

0
22

>> तृणमूलच्या महुआ मोईत्रा यांची पत्रकार परिषदेत मागणी

तृणमूल कॉंग्रेसच्या गोवा प्रभारी व खासदार महुआ मोईत्रा यांनी काल गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील दोडामार्ग येथे १.२० हेक्टर एवढी खाण जमीन खरेदी केलेली असून हा सौदा किती कोटी रु.चा आहे याची चौकशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनाविलंब करावी, अशी मागणी केली. काल दोनापावला येथील इंटरनॅशनल सेंटर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी प्रमोद सावंत हे सरकारी आयुर्वेदिक डॉक्टर होते. राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांच्याकडे करोडो रुपयांची मालमत्ता खरेदी करण्यासाठी एवढा पैसा कुठून आला याची चौकशी होण्याची गरज असल्याचे मोईत्रा म्हणाल्या.

प्रमोद सावंत यांनी जी मोठी जमीन खरेदी केलेली आहे त्याची चौकशी केली जावी अशी मागणी आपण नरेंद्र मोदी यांच्याकडे केली असल्याचे सांगून त्याबाबत संसदेतही आपण आवाज उठवणार असल्याचे त्या म्हणाल्या.

हा शेतकर्‍यांचा विजय
पंतप्रधान मोदी यांनी वादग्रस्त कृषी कायदे मागे घेतले आहेत हा शेतकर्‍यांचा विजय असल्याचे त्या म्हणाल्या. पण त्याचबरोबर मोदी सरकार हे खोटारडे असून जोपर्यंत हे कायदे संसदेत मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत मोदी यांच्यावर विश्‍वास ठेवता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

म्हादईचाही सौदा
राज्यातील प्रमोद सावंत सरकारने गोव्याची जीवनदायीनी असलेल्या म्हादई नदीचाही कर्नाटक सरकारबरोबर सौदा केल्याचा व सगळे पाणी कर्नाटकला वळवू दिल्याचा आरोपही मोईत्रा यांनी केला. त्यामुळे न्यायालयात पराभव झालेला असतानाही कर्नाटक म्हादईचे पाणी वळवू शकल्याचे त्या म्हणाल्या.