तिकीट वाटपावरून दिल्ली भाजपा कार्यकर्त्यांत असंतोष

0
108

कार्यालयासमोर अमित शहांच्या विरोधात घोषणाबाजी
दिल्ली भाजपाचे अध्यक्ष सतीश उपाध्याय यांना पक्षाने उमेदवारी जाहीर न केल्याने त्यांचे समर्थक चिडले असून या निषेधार्थ आंदोलनाचा बडगा उगारीत कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयाबाहेर भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.भाजपने सोमवारी रात्री उशिरा ६२ उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यात सतीश उपाध्याय यांचे नाव नसल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. पूर्वांचलला प्रतिनिधित्व नाकारून अन्याय केला असल्याची धारणा कार्यकर्त्यांची बनली आहे. या निर्णयाने दुखावलेल्या कार्यकर्त्यांनी नवी दिल्ली मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार नूपुर शर्मा यांच्या बैठकीतही धुडगूस घालून त्यांना बोलण्यास मज्जाव केला.
दिल्ली भाजपाचे नेते धीरसिंग बिंदुरी आणि पक्षाच्या अन्य चार गटाध्यक्षांनी तिकीट वाटपावरून बंड पुकारत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. ‘‘आपण पक्षाच्या सर्व पदांचा राजिनामा दिला आहे’’ बिंदुरी म्हणाले. दिल्ली भाजपाचे उपाध्यक्ष शिखा राय यांच्या समर्थकांनीही पक्षाच्या कार्यालयासमोर निदर्शने करून राय यांना तिकीट नाकारल्याच्या विरोधात घोषणाबाजी केली. अन्य एक नेते जय प्रकाश यांनी सदर मतदारसंघातून तिकीट नाकारल्याबद्दल निषेध व्यक्त केला आहे. रोहिणी मतदारसंघाचे इच्छुक भाजप उमेदवार जय भगवान यांनी पक्ष सोडण्याची धमकी दिली आहे.
दरम्यान, सतीश उपाध्याय यांनी आपण पक्षाचा कार्यकर्ता असून भाजपच्या विजयासाठी झटणार असल्याचे म्हटले आहे. सगळेच रिंगणात उतरले तर काम कोण करणार असा प्रतिसवाल त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. आपण पक्षनेतृत्वाचा सन्मान करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कॉंग्रेसने भाजपच्या या प्रकाराची खिल्ली उडवली आहे. कॉंग्रेस प्रवक्ता पी. सी. चाको म्हणाले की, घरच्यांना डावलून आयात केलेल्यांना उमेदवारी देण्याची निती अनेक वर्षे कार्यरत असलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना धक्का देण्याचा प्रकार आहे. अमित शहा यांची ही योजना यशस्वी होणे कठीण आहे.
निवडणूक आयोगाची केजरीवालांना नोटीस
‘सगळ्यांकडून पैसे घ्या पण आपला मते द्या’ असे जाहीर आवाहन केजरीवालने केल्यानंतर कॉंग्रेसने केजरीवालविरुद्ध केलेल्या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे. कॉंग्रेसने केजरीवाल यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप केला होता. निवडणूक आयोगाने केजरीवाल यांना २२ जानेवारी रोजी संध्याकाळी ४ पर्यंत उत्तर देण्यासाठी वेळ दिली आहे.