तात्यासाहेब, कृतज्ञ आम्ही…!

0
45
  • – नारायण महाले

मराठी भाषा गौरव दिन २७ फेब्रुवारी रोजी मराठी साहित्याचे मानदंड ‘ज्ञानपीठकार’ विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ ‘कुसुमाग्रज’ यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. मराठीची थोरवी सांगण्याचा हा दिवस. कुसुमाग्रजांनी मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले. यानिमित्ताने कुसुमाग्रजांच्या वाङ्‌मयीन कार्यकर्तृत्वाला उजाळा…

कुसुमाग्रजांची आज ११० वी जयंती. त्यांचा जन्म पुणे येथे; पण वास्तव्य मात्र नाशिकला. त्यांनी १० मार्च १९९९ ला लौकिक जगाचा निरोप घेतला. पण त्यांनी समृद्ध वाङ्‌मयाचे लखलखीत अक्षरलेणे मागे ठेवले आहे. केशवसुतांनंतरचा समाजमनस्क कवी म्हणून मराठी काव्यक्षेत्रामध्ये कुसुमाग्रजांचा उल्लेख केला जातो. त्यांना वाङ्‌मयक्षेत्रातला सर्वोच्च असा ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. भाऊसाहेब खांडेकरांनंतर मराठी साहित्यिकाला मिळालेला हा दुसरा पुरस्कार.

कुसुमाग्रज हे जीवनातील प्रेयसापेक्षा श्रेयसाला अधिक प्राधान्य देणारे विचारवंत कवी. ते प्रदीर्घ, अर्थपूर्ण व समृद्ध जीवन जगले. त्यांची जीवनधारा प्रकाशपुजकाची. ध्यास मानवधर्माचा. कवितेनेच आपल्याला जगण्याचा मंत्र दिला, जगवलं, ही त्यांची कवितेविषयीची कृतज्ञतेची भावना.

कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) फक्त कवितेपुरतेच मर्यादित नाहीत. त्यांच्या वाङ्‌मयीन व्यक्तिमत्त्वाची अनेक रूपं आहेत. आपल्या अभिजात शैलीने त्यांनी मराठी नाटक भावसमृद्ध केले. कादंबरी, कथा, आस्वादक समीक्षा आणि ललित निबंध हे वाङ्‌मयप्रकार त्यांनी तितक्याच समर्थपणे आणि समृद्धपणे हाताळले. त्यांच्या या सार्‍याच वाङ्‌मयाला ‘कुसुमाग्रज’स्पर्श आहे. त्यांना उत्कट संवेदनशीलता लाभलेली आहे. मराठी मातीने त्यांना जे काही दिले, ते ऋण त्यांनी मुक्त मनाने फेडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या एकंदरीत जडणघडणीत पूर्वसुरींचा संस्कार आहे. कोणतीही नोकरी न स्वीकारता त्यांनी स्वतःला साहित्यनिर्मितीसाठी वाहून घेतले.

कुसुमाग्रजांचा पहिला काव्यसंग्रह ‘जीवनलहरी’ १९३३ साली प्रसिद्ध झाला. साधारणपणे १९३२ ते १९४१ या दरम्यानच्या त्यांच्या निवडक ५७ कवितांचा संग्रह १९४२ साली वि. स. खांडेकर यांनी ‘विशाखा’ या नावाने प्रसिद्ध केला. यातून समाजजीवनातील दाहक वास्तवतेचा वेध त्यांनी घेतला. तत्कालीन समूहमनाचा उत्स्फूर्त आविष्कार त्याच्यातून व्यक्त झाल्याने समकालीन कवितेत ही कविता वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरली.

१९३३ ते १९९४ या काळात कुसुमाग्रजांचे एकूण १३ कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. ‘समिधा’ (१९४७), ‘किनारा’ (१९५२), ‘मराठी माती’ (१९६०), ‘स्वगत’ (१९६२), ‘हिमरेषा’ (१९६४), ‘वादळवेल’ (१९६९), ‘छंदोमयी’ (१९८२), ‘जीवनलहरी’ (१९३३) हे त्यांचे काही निवडक कवितासंग्रह.
‘अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा’ असे म्हणत त्यांनी कवितेच्या माध्यमातून जीवन ध्येयवादाला अदम्य अशा आशावादाची जोड दिली.
‘ओळखलंत का सर मला’
पावसात आला कुणी-
कपडे होते कर्दमलेले,
केसांवरती पाणी…
‘कणा’ या कवितेत त्यांनी गरीब पण कष्ट करणार्‍या, मूल्यांवर निष्ठा असलेल्या, निस्पृह व करारी तरुणाचे चित्र रेखाटले आहे.
‘मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा-’

  • पुरात सारे काही गमावलेल्या तरुणाचे चित्र कवितेच्या माध्यमातून त्यांनी रेखाटले आहे.
    कुसुमाग्रजांची काव्यविषयक जाणीव लक्षात घेण्याजोगी आहे.
    तुम्ही जेव्हा
    माझ्या कवितेशी बोलता
    तेव्हा माझ्याशी बोलू नका
    कारण माझ्या कवितेत
    मी असेन बराचसा
    बहुधा,
    पण माझ्या बोलण्यात मात्र
    तुम्ही असाल
    पुष्कळदा
    आपली कविता समाजमनाची, सामाजिक भावस्पंदनाची कविता असल्याची ग्वाही त्यांनी दिलेली आहे.
    ‘वैष्णव’ (१९४६), ‘जान्हवी’ (१९५२) व ‘कल्पनेच्या तीरावर’ (१९५६) या वि. वा. शिरवाडकरांच्या तीन कादंबर्‍या. त्याआधीच कवी म्हणून ते मराठी रसिकांत ज्ञात झाले होते. ‘दूरचे दिवे’ हे त्यांचे पहिले नाटक १९४६ साली प्रकाशित झाले. त्यानंतर ‘नाटककार’ म्हणून त्यांची प्रतिभा झपाट्याने बहरली आणि १९५० नंतरचे महत्त्वाचे नाटककार म्हणून त्यांना मान्यता आणि लोकप्रियताही लाभली.
    १९४६ साली शिरवाडकरांनी ‘दूरचे दिवे’ हे पहिले नाटक लिहिले, तर १९८७ साली ‘कैकयी’ हे शेवटचे. या दरम्यान त्यांची एकूण १८ नाटके प्रसिद्ध झाली. ‘दुसरा पेशवा’ (१९४७), ‘वैजयंती’ (१९५०), ‘कौंतेय’ (१९५३), ‘राजमुकुट’ (१९४५), ‘ऑथेल्लो’ (१९६१), ‘ययाती आणि देवयानी’ (१९६६), ‘नटसम्राट’ (१९७१) अशी त्यांची काही निवडक नाटके.
    शिरवाडकरांच्या नाट्यसृष्टीवर सहज नजर टाकली तर ते स्वतंत्र प्रज्ञेचे समर्थ नाटककार असल्याचे लक्षात येते.
    ‘शोध शेक्सपीअरचा’ (१९८३), ‘रूपरेषा’ (१९८४), ‘हे सारस्वताचे झाड’ (१९९३), ‘मराठीचिये नगरी’ (१९९५) व ‘एखादं पान- एखादं फूल’ (१९९६) हे लेखसंग्रह तात्यासाहेब शिरवाडकरांच्या नावावर आहेत. त्यातून त्यांचा ‘साहित्यविमर्शक’ म्हणून असलेल्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय होतो.
    ‘कवी कुसुमाग्रज’ आणि ‘नाटककार वि. वा. शिरवाडकर’ म्हणून त्यांची प्रतिमा रसिकांच्या मनात ठसलेली आहे.
    मराठी मातीची थोरवी अधोरेखित करणारे आणि मानवताधर्माचे उद्गाते म्हणून कुसुमाग्रज पुनः पुन्हा आठवत राहतील. त्यांच्या कवितेत त्यांच्या अंतःकरणाचा ओलावा आहे. उत्तम नाटककार, कादंबरीकार, कथाकार, ललित निबंधकार, रसज्ञ समीक्षक आणि कुशल अनुवादक हे त्यांच्या वाङ्‌मयीन कार्यकर्तृत्वाचे पैलू.
    कवी समाजातून निर्माण होतो. तो समाजाचा असतो. पण त्याचे म्हणून स्वतंत्र जग असते, याची ग्वाही कुसुमाग्रजांची कविता देते.
    दूर हजारापासूनि आहे
    विजनामधि माझे घरटें
    मीपण भरलें जयात माझें
    जे आहे माझ्यापुरतें
    त्यांनी कोणत्याही रूढ विचारप्रणालीच्या चौकटीत स्वतःच्या काव्यप्रतिभेला बंदिस्त होऊ दिले नाही हा त्यांचा स्वभावविशेष. आपल्या प्रतिभेने त्यांनी मराठी साहित्यविश्‍व प्रकाशित केले. त्यांचे वाङ्‌मयीन कर्तृत्व आणि व्यक्तित्त्व साहित्याच्या सीमा ओलांडून सांस्कृतिक जीवनात स्थिरावले आहे.
    कुसुमाग्रज मराठीच्या काव्यप्रांगणातील तसेच नाट्यप्रांगणातील एक विशाल वटवृक्ष आहे. मराठी रसिकतेचे तसेच मराठी भाषेचे भरणपोषण त्यांनी केले आहे. त्यांच्या ११० व्या जयंती आणि मराठी दिनाच्या निमित्ताने त्यांना आदरांजली आणि विनम्र अभिवादन!