नवे संचालक प्रसन्न आचार्य यांची माहिती
खाण खात्यात तांत्रिक कर्मचार्यांना आता ताबडतोब खाणींवर त्यांच्या कामावर पाठवले जाईल व प्रशासकीय काम ज्यांनी करायला हवे त्यांच्याकडेच ते सोपवण्यात येईल, असे नवे खाण संचालक प्रसन्न आचार्य यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
खाण खात्यातील भोंगळ व्यवहार सुरळीत करण्यावर आपण आता पूर्ण लक्ष केंद्रित केले असल्याचे त्यांनी सांगितले. प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
खात्यातील तांत्रिक कर्मचार्यांवर प्रशासकीय कामाची जबाबदारी सोपवण्यात आली असल्याचे आपणाला आढळून आले असल्याचे सांगून त्यामुळे जे तांत्रिक कर्मचारी खाण परिसरात असायला हवे होते ते खात्याच्या कार्यालयातच अडून पडले असल्याचे दिसून आल्याचे आचार्य यांनी सांगितले.
प्रत्येक खनिज निर्यातदाराची कागदपत्रे तसेच खाण परवानाधारकांची कागदपत्रे तपासून पाहण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे आचार्य यांनी स्पष्ट केले.
खनिज वाहतुकीत सुसूत्रता व शिस्त आणण्यासाठी कोणती उपाययोजना केली जाणार आहे असे विचारले असता खाण खात्याला त्याबाबत जे अधिकार आहेत त्या अधिकारांखाली खाण वाहतूक नियम तयार केले जातील असे ते म्हणाले. खाणीमुळे होणार्या प्रदूषणाच्या विषयी विचारले असता तो विषय प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याला हाताळावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.