… तर गोवा अद्याप मुक्त न झाल्याचे दाखवून देणार

0
105

गोवा खाण लोक मंचचा ठराव
राज्यातील खाण व्यवसाय येत्या १५ डिसेंबरपर्यंत सुरू न झाल्यास गोवा मुक्तीदिनी पणजीच्या आझाद मैदानावर मेळावा घेऊन गोवा अजूनही मुक्त न झाल्याचे दाखवून देण्याचा ठराव काल खाण लोक मंचने संमत केला.
खाण व्यवसाय लवकर सुरू करण्याच्या मागणीसाठी काल मंचने कदंब बसस्थानकावर धरणे धरले. यावेळी खाण अवलंबितांनी सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजचा आपणास फायदा नाही, असे सांगून सरकारने खाण अवलंबितांना बिन व्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी जोरदार मागणी त्यांनी केली.
बँकांचे कर्ज भरण्यासाठी सरकारने ३५ टक्के अनुदान देण्याची योजना राबवली असली तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले पैसे खाण अवलंबितांकडे नाहीत, असे मंचच्या नेत्यांनी सांगितले.
केंद्रात व राज्यात भाजपचेच सरकार आहे. त्यामुळे वरील मागणी पूर्ण करण्यास कोणतीही अडचण नाही, असे ऍड. सुहास नाईक यांनी भाषणात सांगितले. या सभेत ऍड. राजू मंगेशकर, बार्ज मालक संघटनेचे अध्यक्ष अतुल जाधव, ट्रक मालक संघटनेचे नेते सुरेश देसाई, महेश गावस, आनंद नाईक, सदानंद सावंत आदींची भाषणे झाली.