ईएसजीचा स्वतंत्र संचालक नेमण्याचा मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव

0
220

सीईओलाच पद देण्याचा विचार
आगामी इफ्फीसाठी गोवा मनोरंजन सोसायटी एक स्वतंत्र संचालक नेमण्याबाबत विचार करीत असल्याचे काल सोसायटीतील सूत्रांनी सांगितले. यासंबंधीचा प्रस्ताव ईएसजीने मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे पाठवला आहे. ईएसजीच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यालाच (सीईओ) हे संचालकपद द्यावे व त्यांनीच इफ्फीचे संचालक म्हणून काम पहावे असा प्रस्ताव ईएसजीने तयार केलेला असून तो मुख्यमंत्र्याकडे पाठवून दिलेला आहे. इफ्फी संचालकाची नेमणूक झाल्यास इफ्फीसाठीच्या कामात सुसूत्रता व वेग येऊ शकेल असे इएसजीला वाटत असल्यानेच हा स्वतंत्र संचालकाचा प्रस्ताव सरकारपुढे ठेवण्यात आला असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
दरम्यान, येत्या २० ते ३० नोव्हेंबर या काळात होणार्‍या इफ्फीसाठीची तयारी आता वेग घेऊ लागलेली असून येत्या १५ सप्टेंबर रोजी चित्रपट महोत्सव संचालनालयाची तांत्रिक सिनेमागृहे उपसमिती गोव्यात दाखल होणार असून १७ सप्टेंबरपर्यंत ती गोव्यात असेल. ए. के. बीर हे या समितीचे अध्यक्ष असून शाजी करुण, बी. दिवान, अर्जुन पांडे, अभिनव उपाध्याय व राम सहाय हे या समितीचे सदस्य आहेत. ही समिती गोव्यातील आपल्या तीन दिवसांच्या वास्तव्यात इफ्फीसाठीच्या सगळ्या थिएटर्सची व अन्य सर्व तांत्रिक साधनसुविधांची पाहणी करणार आहे.
दरम्यान, इफ्फीचा उद्घाटन सोहळा व समारोप सोहळा दोनापावल येथील इनडोअर स्टेडिएममध्ये घेण्याचा विचार आहे. मात्र, त्यावर अजून अंतिम शिक्कामोर्तब झाले नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.