
>> संयुक्त राष्ट्र आमसभेतील भाषणात जाहीर इशारा
>> उत्तर कोरियावर बहिष्काराची सूचना
संयुक्त राष्ट्र आमसभेसमोरील आपल्या पहिल्यावहिल्या भाषणात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा इशारा दिला.
उत्तर कोरियाचे नेते किम जॉंग उन यांनी सध्या आपल्या देशाला अण्वस्त्रसज्ज करण्याचा जो प्रयत्न चालवला आहे, त्यासंदर्भात ट्रम्प यांनी हा इशारा दिला. ‘रॉकेट मॅन’स्वतःसाठी व स्वतःच्या राजवटीसाठी आत्मघाती पावले टाकत आहे, असे ट्रम्प उद्गारले.
‘‘उत्तर कोरियाला पूर्णतः उद्ध्वस्त करण्यावाचून आमच्यापाशी दुसरा पर्याय राहणार नाही’’ असे ट्रम्प म्हणाले.
मात्र, ट्रम्प यांनी दिलेल्या या जाहीर धमकीवर उत्तर कोरियाच्या संयुक्त राष्ट्रांतील प्रतिनिधीने प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.
ट्रम्प यांनी आपल्या ४१ मिनिटांच्या भाषणात इराणच्या आण्विक महत्त्वाकांक्षेचाही समाचार घेतला. व्हेनेझुएलातील लोकशाहीचा अंत तसेच इस्लामी दहशतवाद्यांचा धोका या विषयांचाही त्यांच्या भाषणात उल्लेख झाला. क्यूबाच्या सरकारवरही त्यांनी कठोर टीका केली.
उत्तर कोरिया आपल्या क्षेपणास्त्र व अण्वस्त्रचाचण्या बंद करीत नाही, तोवर त्यावर बहिष्कार घालावा अशी सूचना ट्रम्प यांनी यावेळी संयुक्त राष्ट्रांना केली.
काही राष्ट्रे अशा राजवटीसमवेत व्यापारच करतात असे नव्हे, तर त्यांना आर्थिक व इतर पाठबळ देतात हे खेदजनक आहे, असे ट्रम्प यांनी चीनचे नाव न घेता सांगितले. इराणशी बराक ओबामा यांनी आपल्या कार्यकाळात केलेला आण्विक करार आपल्याला मान्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, ट्रम्प यांचे भाषण होण्याआधी संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव आंतोनियो गुतेर्रस यांनी उत्तर कोरियाशी युद्ध टाळावे असे आवाहन संयुक्त राष्ट्रांना केेले होेते. आपण स्वतःला युद्धात झोकून देता कामा नये असे ते म्हणाले.