गोवा व कोकणात मुसळधार पाऊस

0
266
Exif_JPEG_420

काल मंगळवारी दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे गोवा तसेच कोकणातील जनजीवन विस्कळीत झाले. गोव्यात काल संध्याकाळी मुसळधार पाऊस पडला. मात्र कोकण परिसरात गेले दोन-तीन दिवस सतत पाऊस पडत आहे. राज्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यानंतर संध्याकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे राजधानी पणजीसह विविध शहरे व गावांतील जनजीवन विस्कळीत झाले. विशेषतः राजधानीत जोरदार वृष्टी झाल्याने गटारे भरून रस्त्यावरून पाणी वहात होते. त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले कणकवली या तालुक्यांतही पावसाने जोरदार वृष्टी केली असून तेथील जनजीवनावर याचा परिणाम झाला आहे. या मुसळधार पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान, आज बुधवारी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राज्यात पडण्याची शक्यता असल्याची माहिती पणजी वेधशाळेने दिली आहे. मात्र हवामान खात्याने धोक्याचा इशारा दिलेला नाही.

  • पेडण्याला पावसाने झोडपले
    पेडणे तालुक्याला काल मुसळदार पावसाने झोडपले. त्यामुळे डोंगराळ व किनारी भागातील जनजीवन विस्कळीत झाले. मासेमारी करणार्‍या स्थानिक व्यावसायिकांच्या झोपड्यांना धोका निर्माण झाला आहे. शिवाय किनारी भागातील कुटिरांनाही धोका निर्माण झाला आहे. तालुक्यातील बहुतांश रस्ते पाण्याखाली गेले असून शेतीही आडवी झालेली आहे.
    तालुक्यात गेले चार दिवस सतत पाऊस पडत असल्याने दैनंदिन कामकाजावर बराच परिणाम झाला आहे. शापोरा नदी व अरबी समुद्राला उधाण आल्याने पारंपरिक मासेमारी करणार्‍या व्यावसायिकांनाही समुद्रात मासेमारी करायला मिळत नाही. त्यामुळे ताजी मासळी उपलब्ध होत नाही.
    पार्से महादेव मंदिरापर्यंत पाणी
    पार्से येथील श्री भगवती मंदिरासमोर असलेल्या हरिहरेश्वर मंदिर परिसरात डोंगर माळरानावरून आलेले पाणी मंदिराच्या पायर्‍यांपर्यंत पाहोेचले. शिवाय शापोरा नदीला उधाण आल्याने धोक्याची सीमा गाठलेली आहे. मोरजी येथील नदीकाठी असलेल्या घरांना धोका निर्माण झाला असून नदीचे पाणी घरात शिरण्याची शक्यता आहे.
    झोपड्यांची पडझड
    किनारी भागात जोरदार वारा आणि पाऊस पडत असल्याने काही झोपड्यांवरील पत्रे उडून गेले झोपड्यांना धोका निर्माण झाला आहे. तसेच समुद्र किनारी भागात पर्यटन हंगाम संपून जी कुटिरे ताडपत्री व प्लास्टिकने झाकून ठेवली होती त्यांनाही धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, तालुक्यातील काही ठिकाणचे रस्तेही या मुसळधार पावसामुळे खचलेले असून त्यामुळे रस्त्यांवर पाणी आलेले आहे. तालुक्यात वीजेचीही समस्या निर्माण झालेली आहे.
  • डिचोली तालुक्यात स्थिती नियंत्रणात

डिचोली तालुक्यात पावसाचा जोर काल काहीसा कमी झालेला आहे. मात्र अनेक ठिकाणी पडझड झाल्याने सुमारे ७५ हजार रुपयांची हानी झाल्याची माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी श्री. गावस यांनी दिली. अस्नोडा येथे बाबलो पेडणेकर यांच्या घरावर झाड पडून ३० हजारांची हानी झाली. तसेच विर्डी येथील रस्त्यावर व वीज वाहिन्यांवर वृक्ष पडून हानी झाली. पाली येथील सातेरी मंदिराजवळील एका घरावर झाड पडून ४० हजारांची हानी झाली. अंजुणे धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने पाणी सोडण्यात आले. मात्र आता स्थिती पूर्ण नियंत्रणात असल्याची माहिती अभियंते श्री. पवाडी यांनी दिली. तसेच आमठाणे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच असून भीतीचे कारण नसल्याचे सांगण्यात आले.
वाळवंटी नदीतील पाणी दुपारी भरतीच्यावेळी सुमारे २ मीटरपर्यंत वाढले होते. मात्र संध्याकाळी १.८ मीटर खाली आली असून कसलाच धोका नसल्याचे अभियंते के. पी. नाईक यांनी सांगितले.
डिचोली नदीच्या पातळीत फारशी वाढ झाली नाही. वरच्या पट्‌ट्यात पाऊस न पडल्याने कसलाच धोका नसल्याचे सांगण्यात आले. नियंत्रण कक्ष सतत आढावा घेत असून काल जीवनमान काही प्रमाणात पूर्वपदावर आल्याचे सांगण्यात आले.
धरण परिसरात सुरक्षा गरजेची
पाण्याचा थरार अनुभवण्यासाठी पर्यटक जीव धोक्यात घालून सर्वत्र फिरत आहेत. त्यामुळे राज्यातील पाण्याची ठिकाणे धोकादायक बनलेली आहेत. पाण्याची खोली माहिती नसताना पाण्यात हे पर्यटक उतरतात. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका बनतो. डिचोलीतील आमठाणे धरण परिसरात कसलीच सुरक्षा नाही. या परिसरातील निसर्ग पर्यटकांना भुरळ घालत असून इथे महाराष्ट्र व कर्नाटकाबरोबरच स्थानिक पर्यटक येतात. त्यांना या पाण्याची खोली माहिती नाही. त्यामुळे ते येथील पाण्यात डुंबतात. हे धोकादायक असून या ठिकाणी जलसंसाधन खात्याने त्वरित सुरक्षा उपलब्ध करून द्यावी तसेच इथे वावरणा़़-या पर्यटकांना रोखावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

  • सिंधुदुर्गात पावसाचा धुमाकूळ
    सिंधुदर्ग जिल्ह्यात दोन दिवस पावसाने धुमाकूळ घातला असून पावसाची संततधार सुरुच आहे. अधून मधून पावसाच्या मोठ्या सरी कोसळत आहेत. जिल्ह्यात काल १३९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आणखी दोन दिवस पाऊस असाच कोसळणार आहे. जिल्ह्यात सर्वत्र पूरस्थिती असून आंबोली परिसरात ढगफुटीसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. कणकवली तालुक्यातही पावसाचा जोर कायम असून पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
  • दोडामार्ग तालुक्यात पावसाचा जोर कायम
    दोडामार्ग तालुक्यात गेल्या चार पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. काल मंगळवारीदेखील मुसळधार पावसाने तालुक्याला झोडपून काढले. तालुक्यातील बहुतेक कॉजवे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे दोडामार्ग तिराळी मार्गावरील वाहतूक जुन्या मार्गाने वळवली. तिलारी तेरवण धरणाचे जादा पाणी नदीपात्रात सोडल्याने तिलारी नदीच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे.
    दोडामार्ग शहरामध्येही काल मंगळवारी पावसाचा जोर कायम राहिला. हेवाळे मुळस कॉजवेवर सकाळपासून पाणी असल्याने गावातील लोकांचा संपर्क तुटला. तिलारी भटवाडी कॉजवेवर आलेले पाणी नंतर कमी झाले. कुडासा पणतुलीॅ कॉजवेवर पाणी आल्याने वाहतूक बंद पडली.
    धरणे भरली
    सतत पडलेल्या पावसाने तिलारी तसेच तेरवण मेढे धरणे क्षमतेपेक्षा जास्त भरल्याने दोन्ही धरणांचे दरवाजे उघडून जादा पाणी तिलारी नदी पात्रात सोडण्यात आले. त्यामुळे तिलारी नदीच्या पातळीत मोठी वाढ झाली. मात्र या पावसाने कुठेही नुकसान व हानी झाली नसल्याचे तहसीलदार कार्यालयातून सांगण्यात आले.