तरुणाईला, प्रौढांना वाचवायला हवं!!

0
219

– प्रा. रमेश सप्रे

रात्र तशी वैर्‍याचीच आहे पण आपण जागं राहिलं पाहिजे- इतरांना जागवलं पाहिजे. उपनिषदातील ऋषींचा (स्वामी विवेकानंदांचा आवडता) मंत्र सदैव ध्यानात ठेवू या- जो प्रौढांनी आणि ज्येष्ठांनी आपला श्‍वास नि ध्यास बनवला पाहिजे- ‘उत्तिष्ठत-जाग्रत.. प्राप्यवरान् निबोधत| .. शृण्वन्तु ते अमृतस्य पुत्राः॥

‘थिंक ग्लोबली, ऍक्ट लोकली’- म्हणजे विचार विश्‍वकल्याणाचा करा पण कृती स्थानिक पातळीवर करा (कार्याचा आरंभ स्थानिक पातळीपासून करा.)

ते तिघे तसे आयुष्यभराचे मित्र. सर्व शिक्षण एकत्र झालेलं, संसार एकत्र केलेले, नोकर्‍यासुद्धा एकत्र. इथं एकत्र म्हणजे एका ठिकाणी- एका काळात. आता निवृत्तीनंतर तिघांचा दिनक्रमही एकसारखाच. सकाळी हास्यक्लब, प्रभातफेरी-रसपान (म्हणजे तुळस-कोरफड (कांटेकुंवर)- कडुनिंब- दुधीभोपळा (लौकी) इ. औषधी रस पिणं) या नित्यक्रमापासून ते सांयकाळी देवदर्शन -गावाच्या सीमेपर्यंत फिरणं- एकत्र बसून टपरीवर चहापान (त्या टपरीवाल्यालाही ‘साखरेशिवाय तीन चहा’ या ऑर्डरची सवय झालीय.) असा कार्यक्रम तिघांचा एकत्रच असे. पण तिघांची मतं, दृष्टीकोन मात्र अगदी भिन्न.
हेच पहा ना. १८ नोव्हेंबरला ‘जागतिक प्रौढ दिवस’ साजरा केला जातो. त्यावर यांच्या प्रतिक्रिया-
नारायणपंत ः कशाला हे निरनिराळे दिवस साजरे करायचे? काही राष्ट्रीय तर काही आंतरराष्ट्रीय. नुसता शक्तीचा अपव्यय. पानंच्या पानं भरून निरर्थक मजकूर. या उद्गारावरून पंतांचा तुच्छतावाद (सिनिसिझम) दिसून येईल. सारंच निरर्थक!

केशवराव यावर गप्प कसे बसतील. म्हणाले- ‘काही नाही हो. हे सगळं मार्केटिंग आहे. अशा दिवसांच्या निमित्तानं जगभर असंख्य शुभेच्छापत्रं (ग्रीटिंग कार्डस्) खपतात. म्हणजे खपवली जातात. फुलांचे गुच्छ (बुके) नि भेट वस्तू किती दिल्या जातात याची गणतीच नाही.
केशवरावांची वृत्ती तशी व्यवहारी वाटली तरी ती निषेधात्मक किंवा नकारात्मकच आहे.
शंकरबाब नेहमी शेवटी बोलतात. यांची वृत्ती व दृष्टी नेहमी सकारात्मक किंवा विधायक असते. ते असल्या राष्ट्रीय किंवा जागतिक दिनांची तरफदारी करतात. म्हणतात- ‘अहो, या निमित्तानं लोकांचं त्या त्या प्रश्‍नाकडे (उदा. लोकसंख्या दिन, पर्यावरण दिन इ.) समाजातील विशिष्ट स्तरातील व्यक्तींकडे (उदा. आईचा-वडलांचा-मुलीचा दिवस, वृद्धांचा, दिव्यांगांचा (अपंगांचा नव्हे!), महिलांचा, अनाथांचा दिन) सर्वांचं लक्ष वेधलं जातं. काही काळ का होईना कृतज्ञतेची जाणीव, धन्यवादाचं वातावरण तयार होतं. शासनाकडून काही योजनांचा आरंभ केला जातो. अशा चांगल्या गोष्टी या विविध दिनांच्या निमित्तानं घडतातच की!
शंकरबाबांचा युक्तिवाद बिनतोड होता. सकारात्मक दृष्टी देणारा व वृत्ती जोपासणारा होता. याच दृष्टीकोनातून आपण सहचिंतन करू या- ‘जागतिक प्रौढ दिना’वर.
अशा जागतिक- राष्ट्रीय किंवा स्थानिक पातळीवर साजर्‍या केल्या जाणार्‍या दिवसांचं महत्त्व ऐतिहासिक-सांस्कृतिक-सामाजिक असं त्रिविध असतं. जागतिक महिला दिन, अंधदिन, दिव्यांग (अपंग नव्हे) दिन, युवा दिन, ज्येष्ठ नागरिक दिन असे दिवस साजरे करताना केंद्रबिंदू ती ती माणसं किंवा तो तो समाजघटक असतो. त्यांच्या कल्याणाचे कार्यक्रम सादर केले जातात, नवीन उपक्रम राबविले जातात तसेच कल्याणकारी प्रकल्पांची सुरुवातही होते. जागतिक राष्ट्रसंघ, जागतिक आरोग्यसंघटना तसेच राष्ट्रीय पातळीवरच्या शासकीय किंवा अशासकीय संघटना (एनजीओ) या सहभागी होतात. एक प्रकारचा यज्ञच असतो तो! त्यामुळे अशा दिनाचं आपण महत्त्व ओळखून स्वागत केलं पाहिजे. आपापली समिधा या विधायक, मानवतापूर्ण यज्ञात अर्पण केली पाहिजे.

अशा जागतिक दिवसांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते स्थानिक (लोकल) तसेच जागतिक (ग्लोबल) पातळीवर संपन्न होतात. ही दुहेरी दृष्टी वाढण्यासाठी हल्ली इंगजीत एक फार छान शब्द तयार झालाय- ग्लोकल! या संदर्भात नानी पालखीवालांसारखे देशप्रेमी- विश्‍वस्नेही विचारवंत जी दोन सूत्र सांगतात ती ध्यानात ठेवू या –

* थिंक ग्लोबली, ऍक्ट लोकली. म्हणजे विचार विश्‍वकल्याणाचा करा पण कृती स्थानिक पातळीवर करा (कार्याचा आरंभ स्थानिक पातळीपासून करा.)

* पेसिमिझम् इन थॉट् बट ऑप्टिमिझम् इन ऍक्शन- म्हणजे आज जर आपले विचार जग-जीवन-निसर्ग यांच्यातील घडामोडींचं-समस्यांचं चिंतन करून निराशावादी बनले तरी आपली कृती मात्र आशावादानं ओतप्रोत भरलेली असली पाहिजे.
‘जागतिक प्रौढ दिना’निमित्तानं एका अर्थी परिपक्व झालेल्या नि अजूनही परिपक्व (मॅच्युअर) होण्याची प्रक्रिया वेगानं चालू असलेला हा मानवेतर प्रेम करणार्‍या, माणुसकी जपणार्‍या विचारवंतांनी दिलेला संदेश किंवा उपदेश न समजता ‘आदेश’ समजायला हरकत नाही.
‘वर्ल्ड ऍडल्ट डे’ला ‘जागतिक प्रौढ दिवस’ असं म्हणणं तितकंसं बरोबर नाही. कारण प्रौढ शब्द प्रौढावस्थेशी जोडला गेलाय, तसेच ‘प्रौढ शिक्षण – प्रौढ साक्षरता’ अशा शब्दांचा संदर्भ वाढलेल्या वयाशी, मध्यमवयीन वयोगटाशी (मिडल् एज ग्रुपशी) अधिक येतो. पण शब्दकोशात तर ‘प्रौढ म्हणजे वयात आलेली, परिपक्व झालेली व्यक्ती’ असा अर्थ दिलेला आहे. थोडक्यात ‘प्रौढ’ या शब्दाच्या अर्थाला अनेक पैलू आहेत.

* शारीरिक पैलू ः या अर्थानं देहाची परिपक्वता (वयात येणं) सुचवली जाते. मुलगा किंवा मुलगी जननक्षम होणं हे इथं मुख्य लक्षण असतं. लग्नाचं वय दाखवतानाही ही क्षमता लक्षात घेतली जाते. एवढंच नव्हे तर मुलगा नि मुलगी या दोघांसाठी निराळं वय गृहीत धरलेलं असतं. त्यांच्या शारीरिक परिपक्वतेनुसार.

* मानसिक (बौद्धिक) पैलू ः स्वतंत्र विचार करण्याची, निवड करण्याची, निर्णय घेण्याची क्षमता इथं मुख्य असते. याचा प्रत्यय लोकशाही देशात मतदानाचं कायदेशीर वय ठरवताना येतो. एवढंच नव्हे तर काळ, शिक्षण, अनुभव, आधुनिकीकरण (मॉडर्नायझेशन) अशा घटकांमुळे या प्रौढतेची मर्यादा बदलू शकते. उदा. आपल्याकडे मतदानाचं वय पूर्वीच्या २१ वर्षांवरून १८ वर्षांवर आणलं गेलं.

* सामाजिक (जीवनविषयक) पैलू ः चालणं – बोलणं – वागणं – जगणं यात जी परिपक्वता प्रत्यक्ष अनुभवांमुळे, निरनिराळ्या परिस्थितीतून (सण-समारंभ-सोहळे यातून) मिळालेल्या अनुभवांमुळे अशी प्रौढता येते. शहरातील मुलं खेड्यातील मुलांपेक्षा सामाजिक दृष्टीनं लवकर प्रौढ बनतात. तर जीवन, निसर्ग यांच्या संदर्भात ग्रामीण भागातील मुलं अधिक परिपक्व असण्याची शक्यता असते.
आपण आजच्या जागतिक प्रौढ दिनानिमित्तानं केवळ अशा वयात आलेल्या, जीवनाच्या दृष्टीनं परिपक्व व्हायला आरंभ झालेल्या व्यक्तींचाच विचार करणार नाही आहोत. सर्वसाधारणपणे १५ ते ३० वर्षे वयोगटातील व्यक्तींच्या एकूण विकासावर – कल्याणावर – सहचिंतन करणार आहोत.

तीस वर्षे पूर्ण केलेली व्यक्ती जीवनाच्या कोणत्या टप्प्यावर असते? काही अपवाद सोडले तर – शिक्षण पूर्ण झालेलं, नोकरी लागलेली, लग्न होऊन एखाद- दुसरं मूलही झालेलं. अशा व्यक्ती प्रौढावस्थेचा विचार करताना डोळ्यासमोर येतात. या व्यक्ती जीवनात बर्‍यापैकी स्थिरस्थावर झालेल्या असतात. जीवनाचा आस्वाद घेऊ लागलेल्या असतात. बरेच नसले तरी काही चांगले-वाईट अनुभव आलेल्या असतात.
हल्ली मात्र शिक्षण व करिअरच्या मागे लागलेली तरुणाई या अवस्थेतही बरीचशी, गतिमान, काहीशी अस्थिर असते. तरीही जीवनातल्या परिपक्वतेचा अनुभव त्यांना येतच असतो. त्यांच्याही संदर्भात सहचिंतन असतं. आपल्या देशाचा विचार केला तर या वयोगटात येणार्‍या प्रौढांची (युवावर्गाची) संख्या सर्व जगात अधिक आहे. खरं तर हा महत्त्वाचा घटक राष्ट्रप्रगतीच्या दृष्टीनं मानला पाहिजे. पण त्यासाठी या मंडळींना काम-रोजगार मिळायला नको? स्वतःचा आबोदाना नि आशियाना (रोटी-कपडा-मकान) स्वतः मिळवायला नको? स्वतःच्याच नजरेत त्यांनी आत्मसन्मानानं, स्वयंपूर्ण जीवन जगायला नको? आपण समाजाचे, देशाचे उपयोगी घटक आहोत अशी त्यांची भावना व्हायला नको? स्वतःचं कुटुंब स्थापून, स्वतःच्या व्यापक परिवाराला आधार द्यायला नको का?
हाच संदर्भ पुढे ठेवून प्रौढत्वाच्या कल्याणाचा (प्रौढांच्या विकासाचा) सकारात्मक विचार करू या.
१) शारीरिक पैलू ः आजसुद्धा (स्वातंत्र्य मिळून सात दशकं झाल्यावरसुद्धा) या आघाडीवर आनंदीआनंद आहे. वयात येण्याच्या वर्षात (खरं त्याच्या आधीच्या बाळ-बालक-किशोर अवस्थांत) शरीराचा विकास योग्य प्रकारे होणं अत्यावश्यक असतं. आरोग्यवान मुलं ही राष्ट्राची मौल्यवान ठेव आहे. गर्वाची गोष्ट आहे. (हेल्दी चाइल्ड, नेशन्स प्राइड) आजच्या दिवसानिमित्त राष्ट्रीय संकल्प केला पाहिजे की सर्वांना किमान पौष्टीक अन्न दिलं जाईल. यासाठी ‘फूड फॉर ऑल’सारख्या केवळ शासकीय कंठाळी घोषणा किंवा कागदी योजना नकोतच. विशेषतः खेड्यापाड्यातल्या वयात आलेल्या मुलींना, भावी मातांना चांगलं खाद्य मिळालंच पाहिजे. हे अवघड नाही. पण देऊ केलेला निधी नि प्रत्यक्षात त्या त्या घटकापर्यंत पोचलेला लाभ यात फार मोठा फरक पडतो तो भ्रष्ट अधिकारी, विधिनिषेधशून्य राजकारणी नेते नि त्यांचे तत्त्वशून्य कार्यकर्ते यांच्यामुळे.

‘ऍडल्ट’ शब्द शरीरानं पूर्ण विकसित अवस्थेला वापरला जातो. कीटकांचा जीवनक्रम पाहताना अंड्यांपासून पूर्ण शारीरिक अवस्थेपर्यंत पोचल्यावर त्याला ऍडल्ट (डास, माशी, बेडूक, इ.) म्हटलं जातं. याच्यासाठी एका अवघड शब्दाचा वापर केला जातो तो म्हणजे ‘वयस्थ’ (वयस्क म्हणजे वृद्ध, म्हातारी व्यक्ती, पण वयस्थ म्हणजे वयात आलेली, परिपक्व झालेली व्यक्ती) आपण साधासोपा प्रौढच शब्द वापरू या.
आहार-व्यायाम (योगसाधना) – मोकळ्या हवेत फिरणं – भरपूर पाणी पिणं – निसर्गाशी मैत्रीचं नातं निर्माण करणं – आरोग्यपूर्ण स्पर्धा – योग्य महत्त्वाकांक्षा – व्यक्तिमत्त्व विकास नि चारित्र्याची जडण-घडण अशा गोष्टींविषयी शाळा – महाविद्यालये – तसेच ग्रामपंचायती, जिल्हापरिषदा यांच्या माध्यमातून, यांच्या साह्यानं सक्रिय मार्गदर्शन करणं अत्यावश्यक आहे. यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रौढविकास अभियान चालवलं पाहिजे. यासाठी आजच्यासारखा दुसरा कोणता योग किंवा मुहूर्त आहे?
२. मानसिक (बौद्धिक) पैलू ः याविषयी तर खूप करायला वाव आहे नि करणं आवश्यकही आहे. साक्षरता वाढणं, शिक्षणसंस्थातून प्रवेशाला गर्दी होणं, दूरवरच्या प्रदेशात उच्च शिक्षण देणारी विद्यालये निघणं हे बौद्धिक परिपक्वतेचं लक्षण नाहीये, कोणतीतरी पदवी – पदविका किंवा प्रमाणपत्र मिळवून नोकरी – पैसा – मिळवण्यासाठीची ही धडपड आहे. त्यादृष्टीनं ती स्वागतार्ह आहे. पण हा सारा केवळ माहितीचा (इन्फर्मेशनचा) मामला आहे. काही अपवाद सोडले तर कोठेही खरा ज्ञानार्थी आढळत नाही. सारे परिक्षार्थी. साधे ‘विद्यार्थी’ही नाहीत. ही अतिशयोक्ती नाही. विदारक सत्य परिस्थिती आहे.
आजच्या दिनाच्या निमित्तानं प्रौढांच्या भावनिक नि खर्‍या बौद्धिक (ज्ञानाच्या) विकासाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. घोषणाभाषणं नकोत. परिचर्चा – परिसंवाद – परिषदा नकोत. मेणबत्ती मोर्चा – एकता दौड असे केवळ प्रतिकात्मक दिखाऊ कार्यक्रम नकोत. हवेत ठोस उपक्रम नि भरीव प्रकल्प. काय करता येईल किंवा करायला हवं?
* समुपदेशन – सर्वांत महत्त्वाची गोष्ट प्रौढांना सर्वस्पर्शी समुपदेशनाची (कॉंप्रिहेन्सिव्ह कौन्सेलिंगची) अत्यंत गरज आहे. व्यावसायिक समुपदेशक, मनोवैज्ञानिक (सायकॅट्रिस्ट) इ.ची चांदी होतेय. पण प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर याचा प्रभाव पडत नाहीये. यासाठी केवळ व्यवसाय मार्गदर्शन, परीक्षा – अभ्यासाविषयी दिशादर्शन यांच्याइतकंच किंवा अधिक आवश्यक आहे – भावना, विचार, कृती यांच्याविषयी समुपदेशन. संस्थासंस्थातून, गटागटानं, पालक – शिक्षक – निवृत्त लोक यांना याविषयी प्रशिक्षण देणं अत्यंत आवश्यक आहे.

आज वाढत्या प्रमाणावरचं नैराश्य – उदासीनता – आत्महत्येपर्यंत नेणारे नकारात्मक विचार यातून प्रौढांच्या भावनिक – बौद्धिक दिवाळखोरीचं दर्शन घडतं. म्हणून असं समुपदेशन अग्रक्रमानं दिलं पाहिजे.
* संधींची उपलब्धता ः केवळ रोजगार नव्हे तर स्वयंपूर्ण बनवणारे उद्योग, त्यासाठी लागणारी कौशल्यं-तंत्रं यांचा विकास, स्वयंसहाय्य करणारे उपक्रम यासाठी आर्थिक साह्य व मार्गदर्शन करणं आवश्यक आहे. नोकरी एक्के नोकरी मिळवणं हा एकसूत्री कार्यक्रम प्रौढांचा नसला पाहिजे तर त्यांनी स्वतःचे उद्योगव्यवसाय उभारून नोकर्‍या-रोजगार निर्माण केले पाहिजेत.

* आरोग्यसंवर्धन – प्रौढावस्था हा जीवनाचा मुख्य कार्यकाल व जडणघडणीचा काळही आहे. व्यसनमुक्तीचे प्रत्यक्ष कार्यक्रम हवे आहेत. चित्रं-भित्तिपत्रकं (पोस्टर्स) नकोत-थेट कृती हवी. शाळाकॉलेजातून भ्रष्टाचारमुक्त सकस आहार सवलतीनं दिला पाहिजे. योगसाधना – साधे पण प्रभावी व्यायाम, (केवळ महागड्या जिम नकोत!) यांची सतत प्रात्यक्षिकं दिली पाहिजेत. यासाठी संगणकासारखा आधुनिक यंत्र व यंत्रणांचा उपयोग केला पाहिजे.

* केवळ डिजिटल लिव्हिंग नको… तर स्पिरिच्युअल लाइफही हवं. मोबाइल, संगणक, व्हिडियोगेम्स (अगदी ‘पोकेमान गो’ पासून ‘ब्लू व्हेल चॅलेंज’पर्यंत) यांचा जबरदस्त विळखा प्रौढांच्या जीवनाभोवती आवळला जातोय. या ऑक्टोपसी विळख्यातून, या जीवघेण्या भोवर्‍यातून तरुणाईला-प्रौढांना वाचवायला हवं. याला पर्यायच नाही.

अशा जागतिक दिनानिमित्तानं मानवतेचे पुजारी, सहृदयी विचारवंत, समाजाचं कल्याण चिंतणारे सुधारक अशांनी एकत्र येऊन – अर्थपूर्ण उपजाऊ (वांझोटी नव्हे) चर्चा करून निश्चित प्रभावी ठरेल अशी उपाययोजना शोधून काढली पाहिजे. असं म्हणतात की एक समस्या असेल तर तिला किमान दोन उत्तरं असतात. या आशावादानं निर्धारानं संकल्पपूर्वक वयस्थांच्या (प्रौढांच्या) कल्याणासाठी वयस्कांनी (ज्येष्ठ मंडळींनी) मार्ग शोधले पाहिजेत नि राज्यकर्ते – शासनकर्ते यांच्या माध्यमातून प्रत्यक्षात राबवले पाहिजेत.
रात्र तशी वैर्‍याचीच आहे पण आपण जागं राहिलं पाहिजे- इतरांना जागवलं पाहिजे. उपनिषदातील ऋषींचा (स्वामी विवेकानंदांचा आवडता) मंत्र सदैव ध्यानात ठेवू या- जो प्रौढांनी आणि ज्येष्ठांनी आपला श्‍वास नि ध्यास बनवला पाहिजे- उत्तिष्ठत-जाग्रत.. प्राप्यवरान् निबोधत| … शृण्वन्तु ते अमृतस्य पुत्राः॥