…तरीही निमशिक्षकांचे आंदोलन मागे घेणार नाही ः अजितसिंह

0
96

>>रक्षा मंत्री, मुख्यमंत्र्यांनी दिले आश्‍वासन

संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल धरणे आंदोलनावर असलेल्या निमशिक्षकांची बैठक घेऊन त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिल्याचे या शिक्षकांचे नेते अजितसिंह राणे यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. मात्र मागण्या पूर्ण होईपर्यंत आपले आंदोलन चालूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पर्रीकर यांनी काल या शिक्षकांना चर्चेसाठी पाटो येथील पर्यटन भवनात बोलावले होते. यावेळी पर्रीकर यांनी शिक्षकांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच त्यांच्या मागण्यांविषयी सकारात्मक विचार करण्याचे आश्‍वासन दिल्याचे राणे म्हणाले. ‘भिऊ नका. मी तुम्हाला निराश करणार नाही’, अशा शब्दात पर्रीकर यांनी दिलासा दिल्याचे राणे यांनी सांगितले. पर्रीकर यांच्याकडून आश्‍वासन मिळाल्याने शिक्षकांचे मनोधैर्य वाढले आहे. पर्रीकर यांच्याप्रमाणेच मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही या शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडून आश्‍वासन मिळाल्याच्या पार्श्‍वभूमीवर आता धरणे आंदोलन मागे घेणार का, असे राणे यांना विचारले असता ते म्हणाले की आश्‍वासन मिळाले असले तरी जोपर्यंत मागण्या सरकार पूर्ण करीत नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेण्यात येणार नाही. आपणाला सेवेत कायम करावे या मागणीसाठी ९३ निम शिक्षक गेल्या सुमारे दीड महिन्यापासून धरणे आंदोलन करीत आहेत.